युवासेनेच्या सिनेट सदस्यांवर फोर्ट कॅम्पसमध्ये प्रवेशबंदीची नामुष्की

27 Nov 2019 15:09:16





मुंबई
: महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्ता नाट्याचे पडसाद मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यादरम्यान पाहायला मिळाले. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी 'आम्ही१६२'चा नारा दिला. मात्र त्याचवेळी युवासेनेकडून गोंधळ घालण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर त्यांना सभागृहात प्रवेशबंदीचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले होते. परंतु सत्तास्थापनेच्या तिढ्यामुळे राज्यपाल व मुंबई विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी दीक्षांत समारंभाला येण्याचे टाळल्याने युवासेनेच्या सिनेट सदस्यांवरील प्रवेशबंदी टळली.


मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ फोर्ट मंगळवारी फोर्ट कॅम्पसमध्ये पार पडला. राज्याचे राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती असल्याने समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी होते. राज्यपाल समारंभाला उपस्थित राहणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी युवासेनेच्या सिनेट सदस्यांना विद्यापीठ परिसरात प्रवेशबंदी करण्याच्या सूचना विद्यापीठाच्या सुरक्षारक्षकांना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सकाळपासूनच मुंबई पोलीस आणि विद्यापीठाच्या सुरक्षारक्षक अधिकार्‍यांनी तयारीही केली होती. परंतु राजभवनातून राज्यपाल समारंभाला हजर राहणार नसल्याचे कळविण्यात आल्यानंतर पोलीस आणि विद्यापीठाच्या सुरक्षा अधिकार्‍यांनी युवासेनेच्या सिनेट सदस्यांना सभागृहात प्रवेश देण्यात आला. राज्यपालाच्या अनुपस्थितीतही समारंभ संपल्यानंतर प्रदीप सावंत
, डॉ. सुप्रिया करंडे, राजन कोळंबेकर, महादेव जगताप, प्रविण पाटकर व शितल देवरुखकर शेठ या सिनेट सदस्यांनी दीक्षांत सभागृहाबाहेर आम्ही १६२चे फलक झळकावले.

Powered By Sangraha 9.0