येत्या काही दिवसांत शिवसेनेत मोठा भूकंप होणार!

25 Nov 2019 10:03:28
 

मुंबई :आगामी काळात शिवसेनेत मोठा भूकंप होणार असून सेना आमदारांचा एक गट भाजपला येऊन मिळणार आहे,” असे सूतोवाच भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा यांनी केले. शिवसेनेत भूकंप होणार असल्याचे सांगत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही भाजपलाच पाठिंबा देतील, असा दावाही त्यांनी केला.

 

रवी राणा हे अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील अपक्ष आमदार असून गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी, “भाजप आणि राष्ट्रवादी मिळून राज्यात नवे सरकार स्थापन करतील,” असे भाकीत केले होते. त्यांचे हे भाकीत तंतोतंत खरे ठरले. त्यानंतर रविवारी त्यांनी पुन्हा शिवसेनेत भूकंप होणार असल्याचे सूतोवाच केल्याने याबाबत अनेक तर्कवितर्क लढविण्यात येऊ लागले.

 

ते म्हणाले, “आमच्याकडे बहुमताचा आकडा असून एकूण १७५ आमदार आमच्याकडे आहेत. आम्ही यादी तयार केली आहे. त्यातून हा आकडा आला आहे. येणार्‍या काळात शिवसेनेत मोठा भूकंप होईल. मोठी फूट पडेल. शिवसेनेचा एक गट आमच्यासोबत येईल. त्यामुळे आमचे संख्याबळ आपोआप वाढेल. पण कमी होणार नाही,” असे राणा म्हणाले.

Powered By Sangraha 9.0