
मोठ्या विश्रांतीनंतर अभिनेता अभिषेक बच्चन एका भन्नाट चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट शाहरुखचा असून यात अभिषेक मुख्य भूमिकेत झळकणार आहे. शाहरुख या चित्रपटात अभिनय करणार नसून त्याच्या ‘रेड चिलीज एन्टरटेनमेंट’च्या बॅनर खाली या चित्रपटाची निर्मिती होणार आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून नुकतीच त्यांच्या ‘बॉब बिस्वास’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
कोण आहे बॉब बिस्वास?
'नोमोशकर, एक मिनट...’ हे ऐकल्यानंतर आजही एक चेहरा समोर येतो. तो म्हणजे २०१२मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कहानी' चित्रपटातील 'बॉब बिस्वास'चा. सुजॉय घोषचा 'कहानी' हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ही गुढकथा प्रेक्षकांना एका जागी खिळवून ठेवण्यात यशस्वी झाली होती. या चित्रपटातील लोकप्रिय पात्रांपैकी एक म्हणजे 'बॉब बिस्वास'. या काल्पनिक पात्राला प्रेक्षकांनी इतकं डोक्यावर घेतलं. या पात्राची सोशल मीडियावर देखील बरीच चर्चा झाली. याच काल्पनिक पात्रावर दिग्दर्शक सुजॉय घोष या चित्रपटाची निर्मित करत असून, अभिषेक 'बॉब बिस्वास'च्या भूमिकेत दिसणार आहे.
कहानी मधील 'बॉब बिस्वास' ही भूमिका अभिनेता सास्वत चॅटर्जीनं साकारली होती. एलआयसी एजंटच्या रुपातला एक भयानक सायको किलर त्यानं उत्तम प्रकारे साकारला होता. त्याच्या अभिनयाचं प्रेक्षक आणि समिक्षकांकडून देखील कौतुक करण्यात आलं होतं.