आपली संस्कृती संपूर्ण जगाला विविधतेतून एकतेचा संदेश देते : पंतप्रधान मोदी

    दिनांक  24-Nov-2019 20:16:53
|
नवी दिल्ली : "आपली संस्कृती, भाषा या संपूर्ण जगाला विविधतेतून एकतेचा संदेश देतात," असे प्रतिपादन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' मधून केले. आकाशवाणीवरून प्रसारित होणार्‍या या कार्यक्रमात देशवासीयांना संबोधित करताना मोदी म्हणाले, "आपल्या देशात शतकांपासून शेकडो भाषा बहरल्या. संयुक्त राष्ट्रांनी २०१९ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय मातृभाषा वर्ष' म्हणून जाहीर केले. लुप्त होण्याच्या मार्गावर असणार्‍या भाषांचे जतन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत," असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

"उत्तराखंडमध्ये एका समुदायाच्या मोजक्या लोकांनी भाषा संवर्धनासाठी केलेले प्रयत्नही पंतप्रधानांनी यावेळी विशद केले. आधुनिक हिंदी साहित्याचे जनक भरतेंदु हरिश्चंद्र आणि तमिळ महाकवी सुब्रमण्यम भारती यांचा उल्लेख करत त्यांनी नेहमीच मातृभाषेवर भर दिला," असेही मोदी यावेळी सांगण्यास विसरले नाही. रविवारी असलेल्या एनसीसी दिनाच्या उल्लेखाने पंतप्रधानांनी 'मन की बात' कार्यक्रमाची सुरुवात शुभेच्छा देऊन केली. "आपण स्वत:ला आजदेखील विद्यार्थी सैनिकच मानतो," असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. "एनसीसीमुळे नेतृत्व क्षमता, देशभक्ती, नि:स्वार्थी सेवा, शिस्त आणि कठोर मेहनत यांचे महत्त्व बिंबवले जाते," असे ते म्हणाले.

 

दरवर्षी २६ नोव्हेंबरला साजर्‍या होणार्‍या संविधान दिनाचे महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले. संविधानाचा स्वीकार करण्याला ७० वर्ष होत असल्यामुळे यावर्षीच्या संविधान दिनाला विशेष महत्त्व असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. अयोध्या निर्णयाचा संपूर्ण देशाने खुलेपणाने आणि शांततेने स्वीकार केला. ही बाब सांगून त्यांनी संयम आणि परिपक्वतेसाठी जनतेचे आभार मानले.