'महाविकासआघाडी'वर भाजपचा 'सर्जिकल स्ट्राईक'

23 Nov 2019 16:30:16


 


मुंबई : आधी 'महाशिवआघाडी' आणि नंतर 'महाविकासआघाडी' तयार करून सत्तेच्या जवळ जाऊ पाहणाऱ्या तिन्ही पक्षांना भाजपने रोखत राज्याला पाच वर्षांसाठी स्थिर सरकार दिले. त्यापार्श्वभूमीला गेल्या काही दिवसांपूर्वीच्या घडामोडी कारणीभूत ठरल्या. शुक्रवारी रात्री काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक मुंबईतील नेहरू सेंटर येथे घेण्यात आली होती. बैठकीला दिग्गज नेते मंडळी उपस्थित होती. राज्याचे आत्ताचे उपमुख्यमंत्री अजित पवारही तिथेच उपस्थित होते. मात्र, सत्तेतील समसमान वाटपावरून चर्चा फिस्कटली.

 

त्यानंतर भाजपने आपले फासे टाकायला सुरूवात केली. मध्यरात्री साडेबारा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघेही राज्यपालांना भेटले. त्यानुसार राष्ट्रवादीच्या काही आमदारांचा पाठींबा भाजपला मिळेल, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला. त्यामुळे फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापनेचा दावा भाजपने केला.

 

त्यानुसार, मध्यरात्री एक वाजता राज्यपालांनी केंद्राकडे शिफारस केली. राष्ट्रपती राजवट हटवण्याची सकाळी सातची शपथविधीची वेळ ठरली. काँग्रेस शिवसेनेला बाजूला ठेवून भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले. यात प्रफुल्ल पटेल यांनी मोठी भुमिका बजावली आहे. सध्या राष्ट्रवादीचा मोठा गट भाजपसोबत जाण्यास तयार आहे. हे सारंकाही सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांना होती. त्यानुसार, अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. राज्यपालांनी नव्या सरकारला ३० नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ दिलेला आहे.



Powered By Sangraha 9.0