‘मेट्रो-३’ची ३२ पैकी २३ भुयारे खणून पूर्ण

23 Nov 2019 20:06:30





मुंबई
: मुंबईच्या भूगर्भातून मार्गस्थ होणार्‍या ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ’ या ‘मेट्रो-३’ या प्रकल्पातील आता केवळ नऊ भुयारे खणण्याची शिल्लक राहिली आहेत. मुंबईतील या सर्वात मोठ्या मेट्रो प्रकल्पासाठी ३२ भुयारे खणणे आवश्यक आहेत. त्यापैकी आजवर २३ भुयारांचे काम पूर्ण झाले असून वर्षभरात उर्वरित नऊ भुयारे खणून तयार होणार आहेत. शहरात सध्या पाच मेट्रो मार्गिकांच्या निर्मितीचे काम वेगाने सुरू आहे. यामधील चार मार्गिका उन्नत स्वरूपातील असून एक मार्गिका भुयारी आहे. या मार्गिकांमध्ये भविष्यात वाहतुकीच्या दृष्टीने सर्वात वेगवान ठरणार्‍या ‘मेट्रो-३’ मार्गिकेच्या निर्माण कार्याने वेग धरला आहे.




या मार्गिकेच्या भुयारीकरणाच्या कामाला सप्टेंबर २०१७ मध्ये सुरुवात करण्यात आली होती
. सर्वप्रथम माहीमच्या नयानगर येथील विवरात ‘टनल बोअरिंग मशीन’ (टीबीएम) उतरविण्यात आले होते. या प्रकल्पाअंतर्गत भुयारे खणण्यासाठी एकूण १७ टीबीएम यंत्रे मुंबईच्या पोटात कार्यरत आहेत. ही यंत्रे भूगर्भात उतरविण्यासाठी कफ परेड, इरॉस सिनेमा, आझाद मैदान, सायन्स म्युझियम, सिद्धिविनायक, नयानगर, बिकेसी, विद्यानगरी, पाली मैदान, सारिपुत नगर, सहार रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी २ येथे विवरे तयार करण्यात आली आहेत. या प्रकल्पातील पहिले भुयार सप्टेंबर २०१८ रोजी पूर्ण झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या भुयारीकरणाच्या या कामामधील २३ वे भुयार गुरुवारी तयार झाले.



माहिमच्या नयानगर येथील विवरातून धारावीचे दिशेने भुयारीकरणासाठी सोडलेले
‘ कृष्णा-१ ‘ हे ‘टीबीएम’ यंत्र गुरुवारी जमिनीबाहेर पडले. या यंत्राने ५९० मीटरचे भुयार खणले. यावेळी यंत्राने पश्चिम रेल्वेवरील ‘माहिम ते वांद्रे’ दरम्यानच्या रुळांखालून सुरक्षितरित्या भुयारीकरण पूर्ण केले. शिवाय मिठी नदीला जोडणार्‍या एका पात्राच्या समांतर जाणारे भुयार खणून धारावी येथे बाहेर पडले. यापूर्वी १२ ऑक्टोबर रोजी ‘कृष्णा-२’ या यंत्राने याच पट्ट्यात भुयारीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली होती. गुरुवारी पूर्ण झालेल्या या भुयारामुळे ‘मेट्रो-३’ प्रकल्पातील एकूण २३ भुयारे खणून पूर्ण झाली आहेत. या प्रकल्पाकरिता ३२ भुयारे खणायची आहेत. तसेच प्रकल्पाची लांबी ३३.५ किमी असली, तरी दोन भुयारे मिळून एकूण ५२ किमीचे खोदकाम सुरू आहे. डिसेंबर, २०२० पर्यंत भुयारीकरणाचे बहुतांश काम पूर्ण होणार असून डिसेंबर, २०२१ पर्यंत प्रकल्पाचा ‘सीप्झ ते वांद्रे’ हा पहिला टप्पा कार्यान्वित करण्याची तयारी मेट्रो-३ प्रशासनाने केली आहे.

Powered By Sangraha 9.0