संघ मानहानी खटला रद्द करण्याची राहुल गांधी, येचुरी यांची याचिका न्यायालयाने फेटाळली

    23-Nov-2019
Total Views |




मुंबई : गौरी लंकेश यांच्या हत्येत संघाचा हात असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी व माकपा अध्यक्ष सीताराम येचुरी यांनी केला होता. या प्रकरणी दाखल करण्यात आलेला संघाच्या अब्रुनुकसानीचा खटला रद्द करण्याची याचिका या दोघांनी दाखल केली होती. संबंधित याचिका माझगाव न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आता या दोघांनाही या खटल्याला सामोरे जावे लागणार आहे, अशी माहिती हा खटला दाखल केलेल्या अॅड.धृतिमान जोशी यांनी दिली. राहुल गांधी आणि सीताराम येचुरी यांच्याविरोधात अॅड.धृतिमान जोशी यांनी सप्टेंबर २०१७मध्ये हा खटला दाखल केला आहे.



हिंदुत्वविरोधी लिखाण करणाऱ्या व डाव्या विचारांच्या कट्टर समर्थक लेखिका-पत्रकार गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी हत्या झाली होती. ही घटना घडून २४ तास उलटण्याच्या आतच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणात संघाचा हात असल्याचा आरोप केला होता. तर
, संघाच्या विचारसरणीच्या संघ कार्यकर्त्यांनी गौरी लंकेश यांची हत्या केली, असा आरोप सीताराम येचुरी यांनी एका चर्चासत्रामध्ये केला होता. दरम्यान, आपल्याला या प्रकरणात हेतुपुरस्सर गोवण्यात आल्याचा युक्तिवाद करीत हा खटला रद्द करण्यासंबंधी राहुल गांधी व येचुरी यांनी न्यायालयाला विनंती केली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळली असून पुढील कारवाईसाठी ६ जानेवारी २०२० ही तारीख देण्यात आली आहे. तत्पूर्वी राहुल गांधी आणि सीताराम येचुरी उच्च न्यायालयात खटला रद्द करण्यासंबंधी याचिका दाखल करू शकतात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.