दलाई लामा यांचा उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकार चीनला नाही !

22 Nov 2019 16:23:07


 

वॉशिंग्टन : तिबेटीयन बौद्ध धर्मगुरु यांचा उत्तराधिकारी निवडण्याची प्रक्रीया येत्या काही दिवसांतच केली जाणार आहे. मात्र, यामध्ये चीनने हस्तक्षेप करू नये, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. तिबेटवर आपला हक्क गाजवत असतानाच दलाई लामा यांचा उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकार आपल्याकडेच असल्याचा दावा चीनने केला आहे. मात्र, हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेत अमेरिकेने यात अन्य राष्ट्रांनीही लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. चीनकडे असा कुठलाही अधिकार नसून तिबेटमध्ये राहणारे बौद्ध उत्तराधिकारी निवडतील, असे मत अमेरिकेने व्यक्त केले.

 

सॅम ब्राऊनब्रेक या अमेरिकेच्या प्रवक्त्यांनी संयुक्त राष्ट्रात हा मुद्दा उपस्थित करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय संस्था आणि जगभरातील अन्य देशांनीही यावर आवाज उठवण्याचे आवाहन अमेरिकेने केले आहे, जे जे देश वैचारीक स्वातंत्र्यतेवर विश्वास ठेवतात, त्यांनी बोलले पाहिजे. दरम्यान, 'अमेरिका आमच्या अंतर्गत बाबींकडे लक्ष देत आहे.' असा आरोप चीनने केला आहे.

 

'माझा उत्तराधिकारी भारतातूनच असेल', असा विश्वास दलाई लामा यांनी व्यक्त केला होता. मात्र, या वक्तव्याने चीनचा पुरता जळफळाट झाला होता. दलाई लामा यांचा उत्तराधिकारी चीनने जाहीर केल्यास त्याला सन्मान मिळणार नाही, असेही ते म्हणाले होते. या विधानाचा चीनने विरोध केला होता. चीन दलाई लामा यांचा उत्तराधिकारी जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, त्यामुळे अमेरिकेने वेळीच ही भूमीका घेतली आहे.

Powered By Sangraha 9.0