महाराष्ट्रात पक्ष्यांच्या बेकायदा शिकारीचे, खरेदी-विक्रीचे जाळे आजही पसरलेलेच

22 Nov 2019 09:03:42



बीएनएचएसच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञांनी मांडले वास्तव

 

लोणावळा,(अक्षय मांडवकर) : महाराष्ट्रात आजही सुरू असलेल्या स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांच्या शिकारीचे वास्तव गुरुवारी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) आंतरराष्ट्रीय परिषदेत मांडण्यात आले. रंगीत तीतर’, ‘बटेरयांसारख्या पक्ष्यांच्या बेकायदा शिकारीचे आणि खरेदी-विक्रीचे जाळे आजही राज्यात पसरल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. ही परिस्थिती पक्ष्यांना मिळालेले अपुरे कायदेशीर संरक्षण आणि त्यासंदर्भात काम करणार्‍या सरकारी यंत्रणांच्या निष्काळजीपणामुळे निर्माण झाल्याचे अधोरेखित करण्यात आले.

  

भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा, 1972’ मध्ये देशात आढळणार्‍या सर्व पक्ष्यांना संरक्षण देण्यात आले आहे. तरीदेखील देशात स्थलांतरित आणि स्थानिक पक्ष्यांची सर्रास शिकार होत असल्याचे माहिती बीएनएचएसच्या परिषदेमधून समोर आली आहे. या संस्थेने मध्य-आशिया हवाईमार्गावरील स्थलांतरित पक्षी आणि पाणथळ जागाया विषयावर लोणावळ्यात पाच दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. गुरुवारी पार पडलेल्या या परिषदेच्या चौथ्या दिवशी स्थलांतरित आणि स्थानिक पक्ष्यांचा बेकायदा व्यापारया विषयावर चर्चा करण्यात आली.भारतामधील पक्ष्यांच्या 1 हजार, 300 प्रजातींंपैकी 453 प्रजाती शिकार आणि बेकायदा व्यापार्‍याच्या केंद्रस्थानी असल्याची माहिती राष्ट्रीय पातळीवर बेकायदा पक्षी व्यापारावर संशोधन करणारे तज्ज्ञ अबरार अहमद यांनी यावेळी दिली. महाराष्ट्रात सुमारे 20 ते 23 पक्ष्यांच्या प्रजाती बेकायदा व्यापाराच्या गोरखधंद्यात सापडल्या असून पूर्वापार शिकार करत असलेला एक समाज रंगीत तीतरआणि बटेरपक्ष्यांची मोठ्या संख्येने शिकार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

 
 

विदर्भात हा व्यापार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याठिकाणी स्थानिक पक्ष्यांना पकडण्यासाठी गंधारागगेरानामक सापळे-पिंजरे लावले जात असल्याचे अहमद म्हणाले. याविषयी अमरावतीचे मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर यांनी सांगितले की, “अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांच्या संयु्क्त सीमेवरील देवगाव फाट्याजवळ आणि बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील काही भागांमध्ये स्थानिक पक्ष्यांची विक्री होते. मुनिया’, ‘पोपटयांसारख्या स्थानिक पक्ष्यांच्या तस्करीचा मालेगाव-औरंगाबाद-हैद्राबाद हा प्रमुख मार्ग असल्याचे अहमद यांनी सांगितले. 1989 साली स्थानिक पक्ष्यांच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली. तरीदेखील आजही भारतातील काही जमाती उदरभरणाकरिता पक्ष्यांच्या बेकायदा व्यापारावर अवलंबून आहेत.

 
 

स्थानिक पक्ष्यांच्या बेकायदा व्यापाराची कारणे

*पाळणे, मांसभक्षण

* धार्मिक आस्थेपोटी एखाद्या शुभप्रसंगी पक्ष्यांची मुक्तता करण्यासाठी

* जादूटोणा, चेटूक

* औषधोपचाराकरिता

* पक्ष्यांची शर्यत, ससाण्यांची शर्यत आणि त्यांचे प्रदर्शनालय

* प्राणिसंग्रहालय, खासगी संग्रहाकरिता

 
 

संरक्षण कवचाचा अभाव

महाराष्ट्रात सर्वाधिक शिकार होणार्‍या किंवा विकल्या जाणार्‍या तीतर’, ‘बटेरा’, ‘पोपटयांसारख्या स्थानिक पक्ष्यांचा समावेश वन्यजीव संरक्षण कायद्याच्या चौथ्या क्षेणीत आहे. या श्रेणीतील वन्यजीव गुन्ह्यांकरिता केवळ 25 ते 30 हजारांचा दंड आकारला जातो. मात्र, ‘तीतरबटेरापक्ष्यांना विकून विक्रेत्याला प्रत्येक पक्ष्यामागे 200 ते 300 रुपये मिळतात. आठवड्याभरात ते साधारण दहा पक्षी विकतात. त्यामुळे पकडले गेल्यास त्यांना दंडाची रक्कम भरणे आर्थिकदृष्ट्या सोयीचे असल्याचे अबरार अहमद यांनी सांगितले.

फोटो ओळ

शिकारीकरिता लावले जाणारे गंधारा आणि गगेरा पिंजरे; तर इन्सॅटमध्ये यवतमाळमधील एका बाजारात विकण्यास आणलेले तितरपक्षी.

Powered By Sangraha 9.0