पुण्याच्या महापौरपदी भाजपचे मुरलीधर मोहोळ विराजमान

    दिनांक  22-Nov-2019 14:17:48
|पुणे : पुण्याच्या महापौरपदी मुरलीधर मोहोळ यांची बहुमताने निवड झाली आहे. तर, महाविकासाआघाडीचे प्रकाश कदम यांना २९ मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. या निवडणुकीत मोहोळ यांना ९९ मते मिळाली. तर, राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेचे प्रकाश कदम यांना ६० मते मिळाली. या निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी हातमिळवणी केली होती. तर मनसे तटस्थ भूमिका निभावली होती.

 

महापालिकेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक झाली. महापालिकेत भाजपचे ९९, राष्ट्रवादीचे ४१ आणि कॉंग्रेसचे १० नगरसेवक आहेत. तर, शिवसेनेकडे १०, मनसे २ आणि एमआयएमचा १ असे १६३ नगरसेवक आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी ‘व्हिप’ काढला होता. महापौरपद खुल्या गटासाठी आरक्षित होते, त्यामुळे पक्षाकडून मोहोळ यांना संधी देण्यात आला होती.