राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू समाज एकच : भैय्याजी जोशी

    दिनांक  22-Nov-2019 22:03:39
|


 


पुणे : "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू समाज एकच आहेत. त्यामुळे हिंदूचे प्रश्न आणि संघाचे प्रश्न वेगवेगळे असू शकत नाहीत. दोन्हींचा पायादेखील एकसमान आहे. त्यामुळे यात जर काही दोष असतील, तर ते दूर केले जातील," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी स्पष्ट केले.

 

भारतीय मजदूर संघातर्फे संघाचे प्रचारक दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी प्रारंभानिमित्त बुधवार, दि. २० नोव्हेंबर रोजी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी, स्वामी गोविंददेव गिरी महाराज, भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी, संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, मजदूर संघाचे राष्ट्रीय महामंत्री विरजेश उपाध्याय, संघाचे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, मजदूर संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रकांत धुमाळ आदी उपस्थित होते. यावेळी उदय पटवर्धन यांनी दत्तोपंत ठेंगडी यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशनही झाले.

 

यावेळी भैय्याजी जोशी म्हणाले की, "आपल्याला राष्ट्राचे नवनिर्माण नव्हे तर पुर्ननिर्माण करायचे आहे. दत्तोपंत यांच्याकडे दूरदृष्टी होती. देशात साम्यवादाचा बोलबाला होता, तेव्हा ठेंगडी म्हणाले होते की, साम्यवाद टिकणार नाही. आणीबाणीचे भाकीतही त्यांनी वर्तवले होते. त्यांच्या जन्मशताब्दीनंतरचाही सूर्योदय हिंदुत्वाचा असणार आहे. जगाचे नेतृत्व करण्यास भारत उभा राहत आहे."

 

"भांडवलशाही व साम्यवाद या दोन भिन्न कल्पनांभोवती सर्वजण अडकलेले असताना दत्तोपंत यांनी तिसरा मार्ग शोधला. स्वदेशीच्या जागरणासाठी त्यांचा आग्रह असायचा," असे बाबा कल्याणी म्हणाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध अष्टपुत्रे यांनी केले.