राज्यात आजपासून केंद्रीय पथकाकडून नुकसान पाहणी दौरा

22 Nov 2019 11:10:55





मुंबई 
: राज्यात व जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारचे पथक आजपासून नुकसान झालेल्या जिल्ह्यामध्ये पाहणी करणार आहे. अवकाळी पावसामुळे मराठवाडा
, नाशिक यांसह राज्यभरातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काढणीला आलेली पिके पावसामुळे वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर केंद्राकडून आर्थिक मदत मिळावी याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. मराठवाड्यासह अमरावती, नागपूर व नाशिक या जिल्ह्यामध्ये पथकातील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाहणी करण्यात येणार असून डॉ. वी. तिरुपगल हेच या पथकांचेही प्रमुख आहेत.


आज केंद्रीय पथकाकडून नाशिक
, निफाड , चांदवड व मालेगाव याभागात पाहणी होणार आहे. परतीच्या पावसाने द्राक्ष फळबागांसह, मका, सोयाबीन, बाजरी, जवारी व कडधान्ये या पिकांचे नुकसान झाले. नाशिकसोबतच २१ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यात केंद्रातील अतिरिक्त सचिव डॉ. वी. तिरुपगल तसेच डॉ. के. मनोहरन हे पाहणी करणार आहेत. शुक्रवारी औरंगाबाद जिल्ह्यातील १६, शनिवारी बीड जिल्ह्यातील १३, तर रविवारी जालना जिल्ह्यातील आठ गावांना ते भेटी देणार आहेत. दरम्यान राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयानंतर शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार असून शासनाकडे पाठविलेल्या अहवालानुसार, कोरडवाहू जमिनीवरील नुकसान झालेल्या पिकांना अधिक निधी मिळणार आहे. मात्र ही रक्कम तुटपूंजी असल्याने ही रक्कम वाढवून देण्यात यावी अशी मागणी शेतकरी केंद्रीय पथकासमोर करण्याची शक्यता आहे.

Powered By Sangraha 9.0