राष्ट्रहित जोपासणारा ‘महाराष्ट्र वीज कामगार महासंघ’

    दिनांक  22-Nov-2019 21:58:04   
|


 


कामगार चळवळ, कामगार लढा, कामगार संप, कामगारांच्या समस्या आदी अनेक परवलीचे शब्द वृत्तपत्रातून, मोर्चाच्या घोषणांतून आपल्या कानावार पडत असतात. कामगारांचे हित जोपासताना राष्ट्रहिताला प्राधान्य देणारे संघटन म्हणून भारतीय मजदूर संघाशी संलग्न असणारे महाराष्ट्र वीज कामगार महासंघ आपले कार्य तन्मयतेने करत आहे. याचबाबत महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे जाणून घेतलेले कार्य आणि भूमिका...

देश असो व राज्य त्याची औद्योगिक प्रगती होण्यासाठी ‘कामगार’ हा कायमच केंद्रस्थानी असतो. कोणत्याही पातळीवरील उद्योग-व्यवसाय वाढीस लागावे, त्यांची प्रगती व्हावी यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक असते ती म्हणजे वीज. त्यामुळे विद्युत क्षेत्रात कार्य करणारे कामगार यांचे औद्योगिक प्रगतीत असणारे योगदान हेदेखील अतुलनीय असते. कार्य करताना त्यांनादेखील काही समस्या असतात. त्यामुळे त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि त्यांना धोरणात्मक दिशा देण्यासाठी संघटन असणे आवश्यक असते. ‘महाराष्ट्र वीज कामगार महासंघ’ हा राष्ट्रहित जोपासण्याचे उद्दिष्ट समोर ठेवत आपले कार्य आजवर अविरतपणे करत आहे. २५ डिसेंबर, १९६3 मध्ये ‘महाराष्ट्र वीज कामगार महासंघ’ संलग्न ‘भारतीय मजदूर संघ’ याची स्थापना झाली.

या महासंघाच्या माध्यमातूनमजदूर संकेत’ नावाचे मासिक प्रकशित केले जाते. यात ‘कामगार महासंघ’ कार्यक्रमासंबंधी बातम्या असतात. अ. भा. विद्युत मजदूर महासंघ संघटनमंत्री विलासराव झोडगेकर यांचे अभ्यासपूर्ण लेख हे महासंघातील कामगारांना नेहमीच योग्य दिशा देतात. भारतातील १८ राज्यांमध्ये महासंघाचे काम सुरू असून त्यात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल, हरियाणा, पंजाब, राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू, प. बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगण, गोवा, अंदमान आदी राज्यांचा प्राधान्याने समावेश आहे. वीज मंडळातील कर्मचार्‍यांच्या समस्या सोडविणे, कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी वीज कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून करार करणे, समाजोपयोगी कार्यात वनवासी कल्याण आश्रमास मदत म्हणून वस्तुरुपी मदत करणे, वीज कामगारांच्या सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून कामगारांच्या आर्थिक गरजा भागवणे, ‘वीज कामगार कल्याण निधी’च्या माध्यमातून मृत कर्मचार्‍यांच्या वारसांना एक रकमी (१२ हजार रुपये) मदत करणे, राज्यातील नैसर्गिक आपत्तीत सरकार तथा स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आपत्तीग्रस्तांना मदत करणे आदी कार्य हे महासंघाच्या माध्यमातून केले जाते. पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना जनकल्याण समितीच्या माध्यमातून सहा लाख रुपयांची मदत महासंघाच्या माध्यमातून करण्यात आली.

पतसंस्थांच्या माध्यमातून कामगारांचा अपघात विमा काढण्याचे कामदेखील केले जाते. तसेच, सभासदांच्या पाल्यांना गुणवत्ता पारितोषिक देणे, दिवाळी भेट वस्तू देणे आदींच्या माध्यमातून कामगार परिवाराशी स्नेहभाव वृद्धिंगत करण्यात महासंघाची मोलाची भूमिका आहेभारतीय मजदूर संघहा महासंघाचा आदर्श असून राष्ट्रहित जोपासण्याच्या हेतूने मदत करणे, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सहकार्य व सहयोग करणे हे भा. म. संघाचे तत्त्व हे महासंघाच्या माध्यमातून तंतोतंत अंमलात आणले जाते.

सर्वात पहिले राष्ट्रहित त्यानंतर उद्योगहितअसा महासंघाचा कार्याचा क्रम असून दोघांच्या हितातून ‘कामगार हित’ साधणारी संघटना म्हणून कम्युनिस्ट विचारसरणीपेक्षा वेगळेपण जोपासणारी संघटना असे महासंघाचे वर्णन केले तर नक्कीच वावगे ठरणार नाही.

महासंघ हा कोणत्याही हिंसक मार्गास विरोधच दर्शवितो. त्यामुळे उद्योगहिताच्या दृष्टीने कुठल्याही घातपाताच्या कृत्याला विरोध करणे हे महासंघाचे वैशिष्ट्य आहे. म्हणून महासंघाने १९६७च्या संपातून माघार घेतली. तसेच, राष्ट्रप्रेमाने भरलेल्या महासंघाने चीन युद्धाच्या वेळी सैन्यासाठी आवश्यक असणार्‍या वस्तू जसे, कपडे, अन्नपदार्थ जमवून मदत करण्यात आपले योगदान दिले होते.

सर्वोत्तम संस्कारांची शिदोरी सोबत असल्याने आणि त्याच संस्कारातून निर्माण झालेली प्रतिमा यामुळे कोणत्याही संपाच्या वेळी उद्योग व्यवस्थापन बोलणी करताना कमालीचा आदर महासंघास मिळतो. हीच महासंघाने आपल्या कार्यातून निर्माण केलेली आपली प्रतिमा आहे.

वीज कंपन्यांचे व्यवस्थापनाच्या माध्यमातून सध्या जे तांत्रिकीकरण केले जात आहे, त्यामुळे कामगारांवर येणारी बेरोजगारी, तंत्रज्ञान प्रशिक्षणाचा अभाव, २१० मेगावॅटचे पॉवरस्टेशनमधील संच बंद करण्यामुळे कामगार कपात, बदल्या, परसेवेवर पाठविणे या समस्या महासंघासमोर आहेत. तसेच, वाढत्या ग्राहकांच्या संख्या आणि कामगारांची कमी होणारी संख्या या प्रमुख अडचणींचा सामना विद्युत क्षेत्रातील कामगारांना करावा लागत आहे.

मजदूर संघम्हणून या अडचणींवर मात करण्यासाठी व्यवस्थापनाशी चर्चा करून प्रत्यक्ष अडचणी आणि कार्यक्षेत्रातील समस्या यांची मांडणी करून कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न महासंघामार्फत आगामी काळात करण्यात येणार आहे. महासंघामार्फत दत्तोपंत ठेंगडी यांच्या कामगारांचे हित राष्ट्रवादाशी जोडणे या विचारधारेवर काम केले जात आहे


‘सिटू’, ‘इंटक’ या विरोधी संघटनांसोबत काम करत असताना अनेक वेळा त्रासाचा सामना महासंघाला करावा लागला. प्रामुख्याने आणीबाणीच्या काळात खोट्या तक्रारी करून पदाधिकार्‍यांना कारागृहात पाठविणे, व्यवस्थापनाशी हातमिळवणी करून बदल्या करणे, कुठल्याही चर्चेत संघटनेस सोबत न घेण्याचा आग्रह धरून वेगळे पाडण्याचा प्रयत्न करणे, बाळासाहेब साठ्ये यांच्या खंबीर नेतृत्वाने या सर्व अडचणींच्या काळात ‘वीज कामगार महासंघ’ टिकून राहिला व नंतरच्या काळात चांगल्या पद्धतीने वाढला. सामूहिक नेतृत्वाचा हा दृश्य परिणाम संघटना आज अनुभवत आहे.

संघाला ५७ वर्षे झाली. नाशिकमध्ये महाराष्ट्राचे प्रदेश कार्यालय ‘राका कॉलनी’ येथे आहे. तेथे आपल्याला या सर्व कार्याची आणि संस्कारांची सहज अनुभूती येते. औष्णिक विद्युतनिर्मितीला असणार्‍या मर्यादा लक्षात घेता सौरऊर्जेच्या निर्मितीत व कामात आपल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन व प्रशिक्षण देणे, हे आगामी काळातील महासंघाचे धोरण असणार आहे.

जोरदार घोषणा, भडक भाषणे, हातघाईवर येत आपल्या मागण्या पूर्ण करून घेणे असे काही वेळा काही कामगार संघटना धोरण अवलंबताना दिसतात. मात्र, आपल्या कामात आपण प्रगल्भता दाखवली आणि आपले म्हणणे आपण शांत आणि संयतपणे मांडले तरी आपले काम होऊ शकते, याचा वस्तुपाठ महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने निर्माण करून दिला आहे. समस्या या कायमच असतात. मात्र, राष्ट्रहित समोर ठेवून आपल्या समस्याचे निराकरण करणे हे महासंघाचे तत्त्व आजच्या औद्योगिकीकरणाच्या काळात या मार्गाचा अवलंब न करणार्‍या इतर कामगार संघटनांनी आत्मसात करावे असेच वाटते.