हुकमतीचे फटकारे

22 Nov 2019 21:08:52




'हुकमतीचे फटकारे' अर्थातच रंगाच्या ब्रशचे! सोफिया महाविद्यालयामधील ३३ वर्षांच्या कलाध्यापनाच्या प्रदीर्घ अनुभवानंतर प्राध्यापक आणि रेखांकनकार अर्थात चित्रकार गणेश तायडे यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन जहांगिर कलादालनाच्या तिसर्‍या विभागात सुरू आहे.

 

तायडे सरांचा आणि माझा तसा जुना परिचय. कुठल्याही प्रकारचा दिखावा नाही, कुठल्याही प्रकारचा अतिगंड नाही, सादरीकरण म्हणजे मिरविणे असे काहीच नाही. मात्र, रंगांच्या फटकार्‍यांतून कलाकाराच्या 'मनगटातील धमक' आणि कुंचल्याच्या लेपन कौशल्यावरील हुकमत बघणार्‍याला थक्क करून सोडते! विनम्रता किती असावी या माणसात! म्हणतात, “माझ्या आयुष्याला दिशा दाखविण्यासाठी कलाध्यापनातील ३३ वर्षांचा अनुभव म्हणजे माझा कलागुरू आहे. या अनुभवानेच माझे करिअर घडलेले असून माझं जे काम या दालनात प्रदर्शित झालेले आहे, ते मला व्यक्त करावे वाटले, ज्याने मला घडवलं.” फारच संयमित आणि प्रांजळपणे चित्रकार गणेश तायडे यांनी व्यक्त केलेलं हे मत आहे.

 




 

त्यांच्या कलाकृती पाहताना 'माय सिग्नेचर स्ट्रोक' असं जे ते म्हणतात ते अगदी तंतोतंत पटतं. रंगलेपनातील त्यांनी शोधलेलं हे तंत्र पाहणार्‍याला निश्चितच आनंददायक वाटतं. अ‍ॅक्रॅलिक फ्रेश रंगाच्या कॅन्व्हासवर जलरंगी शैलीने केलेला रंगाविष्कार वाखाणण्यासारखा आहे. रेखांकने, 'कटनिब'चा स्वैर तणावरहित सौंदर्याविष्कार, जलरंग, स्केचेस वास्तववादी, कल्पनाविलास रम्य कलाचित्रे अगदी गूढ. परंतु, सौंदर्यकारांच्या लयकारी ब्रश फटकार्‍यांची लकब पाहताना तायडे सरांची हुकमत ध्यानी येते.
 

१९७८ ला सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालयातून 'v'ची पदवी मिळवल्यानंतर, कला महाविद्यालयीन कलानुभव, मित्र-परिवाराकडून होणार्‍या कलासंवादातील प्राप्त ऊर्जा-उत्साह हाच तायडे यांच्या कलाकृतीमागील एक सुप्त आरसा आहे. सोफिया पॉलिटेक्निक समूहाच्या 'आर्ट अ‍ॅण्ड डिझाईन' विभागात मुंबईच्या पेडर रोडवरील कला महाविद्यालयात त्यांनी कलाध्यापन केले. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण शोधता शोधता कलाध्यापन करणार्‍या मोजक्याच कलाध्यापकांमध्ये प्रा. गणेश तायडे यांचे नाव अनुक्रमाने घ्यायला हवे. दि. १९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबरच्या सप्ताहात त्यांचा प्रदीर्घ कलाप्रवास पाहण्याची संधी कलारसिकांना जहांगिर कलादालनाच्या तिसर्‍या गॅलरीत उपलब्ध आहे. कलारसिकांनी याचा लाभ घ्यावा, असेच हे प्रदर्शन म्हणावे लागेल.

 

- प्रा. गजानन शेपाळ

Powered By Sangraha 9.0