५० व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची गोव्यात शानदार सुरुवात

    दिनांक  21-Nov-2019 11:46:43
|


 

एक खिडकी योजनेमुळे अधिकाधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माते भारताकडे आकर्षित होतील प्रकाश जावडेकर

अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्यासह भारतीय सिनेसृष्टीतले दिग्गजांची उपस्थिती

महोत्सवात ७६ देशातल्या २०० चित्रपटांचा आनंद घेता येणार

५० व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज गोव्यात शानदार कार्यक्रमाने प्रारंभ झाला. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, सिनेसृष्टीतले महानायक म्हणून ज्यांचे योगदान ओळखले जाते असे अमिताभ बच्चन आणि रजनीकांत या दिग्गजांची उपस्थिती, शंकर महादेवन आणि जॅझचे दैवत मानले जाणारे लुई बॅन्कस्‌ यांचे बहारदार संगीतमय सादरीकरण अशा भरगच्च कार्यक्रमांनी गोव्यातील शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम मध्ये झालेला हा उद्‌घाटन सोहळा रंगतदार ठरला. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, अमिताभ बच्चन, रजनीकांत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने महोत्सवाचे उद्‌घाटन झाले.

एक खिडकी योजनेमुळे अधिकाधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माते भारताकडे आकर्षित होतील, असे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी भारतात अनेक सुंदर स्थळे आहेत. चित्रिकरणासाठी पंधरा-वीस परवानग्या घ्याव्या लागतात. ही परिस्थिती बदलावी, यासाठी एक खिडकी योजनेचे काम सुरु असल्याचे जावडेकर यांनी यावेळी सांगितले.

फ्रेंच चित्रपटांचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री इसाबेला ह्युपर्ट यांचा यावेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. दहा लाख रुपयांचा धनादेश, स्मृती चिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

सिनेसृष्टीतल्या अमूल्य योगदानाबद्दल प्रख्यात अभिनेते, भारतीय चित्रपट क्षेत्राचे थलैवा म्हणून ओळखले जाणारे रजनीकांत यांना आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबीली ॲवॉर्डने गौरवण्यात आले. सुवर्ण महोत्सवी इफ्फीनिमित्ताने यावेळी एका विशेष टपाल तिकीटाचे प्रकाशनही करण्यात आले. सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांनाही या कार्यक्रमात गौरवण्यात आले.

केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे तसेच जगप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि इफ्फी आंतरराष्ट्रीय ज्युरी अध्यक्ष जॉन बेली, भारतीय ज्युरी अध्यक्ष प्रियदर्शन यांच्यासह चित्रसृष्टीतले अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.

या महोत्सवात ७६ देशांमधले २०० हून अधिक उत्तम चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. इंडियन पॅनोरमा विभागात २६ फिचर फिल्म्स आणि १५ नॉन फिचर फिल्म्स दाखवण्यात येणार आहेत. या महोत्सवात १० हजारहून अधिक सिनेप्रेमी सहभागी होत आहेत. २८ नोव्हेंबर पर्यंत हा महोत्सव सुरु राहिल. इफ्फी महोत्सवाचे संचालक चैतन्य प्रसाद यांनी मान्यवरांचे आभार मानले.