तानसा अभयारण्यात हिवाळी पक्षीदर्शन

21 Nov 2019 19:54:08



शहापूर : महाराष्ट्रातील ताडोबा, नागझिरा, फनसाड, पेंच या अभयारण्यापाठोपाठ तानसा अभयारण्य पक्षीनिरीक्षक व निसर्गप्रेमींच्या पसंतीस उतरले आहे. हिवाळ्याच्या मोसमात तानसा जलाशय परिसरात मुक्कामी असलेल्या विदेशी पक्ष्यांचे थवे विशेष लक्ष वेधत आहेत.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्याच्या ३२० चौरस किलोमीटर अभयारण्याच्या क्षेत्रात एकूण २१२ पक्ष्यांच्या विविध प्रजाती आहेत. त्यातील ५५ पक्षी तानसा तलावाच्या परिसरात राहत आहेत, यात झाडावर वास्तव्य करणारे १२६ पक्षी आहेत, असे तानसा वन्यजीव विभागातून सांगण्यात येत आहे. तलाव व आजूबाजूला असलेल्या घनदाट जंगलातील दुर्मीळ पक्षी हिवाळ्याच्या चार महिन्यांत पक्षी निरीक्षकांच्या रोज नजरेस पडतील. तानसाच्या जंगलात वेगवेगळ्या रंगाचे पक्षी खास हिवाळ्याच्या मोसमात पक्षीनिरीक्षक व निसर्गप्रेमींना साद घालताततानसा अभयारण्यात या मोसमात देशी व परदेशी पक्षी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर येथे संचार करताना आढळतात. पावसाळ्यात पूर्व आफ्रिका देशातून भारतात येणारा स्थलांतरित पक्षी चातक येथे पावसाळ्यात आढळतो.

सध्या हिवाळ्याच्या मोसमातील पक्षी तानसा अभयारण्यात येणार्‍या पक्षीनिरीक्षक निसर्गप्रेमी पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तानसाच्या घनदाट जंगलात पावश्या, भृंगराज, कोतवाल, कोकीळ, हळद्या, नाचन, घुबड, पिंगळ्या, खारीक टक्कोचोर, सुतार, टिटवी खंड्या, दयाळ, लाव्हे, तितर, शिकरा, धोबी, पित्ता, गरुड, घार, सादबहिणी, करकोचा, पोपट, मोर आदी विविध पक्षी तानसा अभयारण्यात वास्तव्य करीत आहेत. काही दुर्मीळ असलेले विदेशी स्थलांतरित पक्षी भातसा, तानसा, वैतरणा, या परिसरातील घनदाट जंगलात मुक्कामी आहेत. जलाशय अभयारण्यात या पक्ष्यांचे सर्वत्र भ्रमण सुरू असते. वेगवेगळ्या प्रकारे आवाज करणार्‍या लाल-पिवळ्या, काळ्या-निळ्या-हिरव्या रंगाचे हे पक्षी सर्वांचेच आता लक्ष वेधून घेत आहेत. या पक्ष्यांच्या सवयी, आवाज, खाद्य, शिकारीच्या पद्धती, राहण्याची ठिकाणे घरटी वेगवेगळी पाहावयास मिळतात. हे सर्व पक्षी तानसाच्या जंगलात आढळतात. महाराष्ट्रातील ताडोबा, नागझिरा, फणसाड, पेंच या अभयारण्याबरोबर तानसा अभयारण्यातही हे पक्षी न्याहाळण्यासाठी पक्षीनिरीक्षकांसह निसर्गप्रेमींच्या वाटा तानसा अभयारण्याकडे सध्या वळल्या आहेत.

-प्रशांत गडगे

Powered By Sangraha 9.0