सुपरस्टार नागार्जुनची 'ब्रम्हास्त्र' मध्ये एंट्री

    दिनांक  21-Nov-2019 16:28:49


दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील स्टार नागार्जुन बहुचर्चित 'ब्रम्हास्त्र' या चित्रपटात झळकणार आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटामध्ये काम करणाऱ्या दिग्गज कलाकारांमध्ये आता आणखी एका नावाची भर पडली आहे.

'अग्नी वर्षा' आणि 'खुदा गवाह' या दोन चित्रपटानंतर पुन्हा एकदा नागार्जुन आणि अमिताभ बच्चन स्क्रीन शेअर करणार आहेत. नागार्जुन या चित्रपटात एका पुरातत्वशास्त्रज्ञाची भूमिका साकारणार आहे. आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमधून नागार्जुनने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. आता बऱ्याच दिवसांनी तो हिंदी चित्रपटात झळकणार असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये सध्या औत्सुक्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

'ब्रम्हास्त्र' या चित्रपटाचे कथानक हे काल्पनिक असून आयान मुखर्जीने या चित्रपटासाठी भारतीय पुरातत्व इतिहासाचा आधार घेतला आहे. या चित्रपटाविषयी यापूर्वी अनेक चर्चा रंगल्या आहेत आणि आता नागार्जुनच्या टीममधील एन्ट्रीमुळे पुन्हा एकदा ब्रम्हास्त्र चर्चेचा विषय ठरला आहे.