रामललाच्या वकिलांचा होणार भव्य सन्मान सोहळा

    21-Nov-2019
Total Views |




 

२४ नोव्हेंबर रोजी के. पराशरन अयोध्येत सादर करणार खटल्याची प्रत

 

लखनऊ : अयोध्या राम मंदिर प्रकरणातील रामलला विराजमानचे वकील के. पराशरन आपल्या तीन पिढ्यांसमवेत रामललाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जाणार आहेत. ९२ वर्षीय पराशरन यांनी रामललाचे पक्षकार म्हणून खटल्यात भूमिका मांडली होती. राम मंदिराचा निकाल रामललाच्या बाजूने आल्यानंतर प्रथमच ते अयोध्येत  जाणार आहेत. विश्व हिंदू परिषदेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत दि. २४ नोव्हेंबर रोजी पराशरन यांच्यासह अन्य वकीलांचा सन्मान यावेळी केला जाईल. 

 

पराशरन यांच्यासह त्यांची संपूर्ण वकिलांचे पथक अयोध्येत जाणार आहे. विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेतेही वकिलांसोबत हजर असणार आहेत. ९ नोव्हेंबर रोजी आलेल्या राम मंदिराच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा भव्य सत्कार समारंभ केला जाणार आहे. केशव पराशरन हे अयोध्या निकालाची प्रतही सोबत घेऊन जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णय आणि निकालाची प्रत सादर करतील. आपल्या दौऱ्यावेळी हनुमान गढीलाही ते भेट देणार आहेत. अयोध्या जिल्हाधिकारी अनुज झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारसेवकपूर येथे हा भव्य सत्कार सोहळा होणार आहे. विश्व हिंदू परिषदेचे नेते चंपत राय, दीनेश चंद्राही यावेळी उपस्थित राहणार आहेत. तीन अधिकाऱ्यांचे पथक वकिलांची भेट घेतली आणि व्यवस्थाही पाहतील.

 
 

के. पराशरन यांच्या कुटुंबातील तीन पिढ्यांतील सदस्य अयोध्येत रामललाचे दर्शन घेतील. यात त्यांची नातवंडे, मुले असा परिवार असणार आहे. पराशरन यांचे पुत्र आणि माजी सॉलिसीटर जनरल मोहन पराशरनही अयोध्येला जाणार आहेत. २२ नोव्हेंबर रोजी त्यांचा संपूर्ण परिवार चेन्नईहून लखनौला पोहोचेल. २३ आणि २४ नोव्हेंबर दरम्यान ते अयोध्येत रामललाचे दर्शन घेतील.