डिस्पाइट द फॉग या चित्रपटाने इफ्फी महोत्सवाची सुरुवात

    दिनांक  20-Nov-2019 15:21:50
|


 

डिस्पाइट द फॉगया इटालियन चित्रपटाने ५० व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून गोव्यात सुरुवात होत आहे. युरोपातला अल्पवयीन शरणार्थी या गंभीर विषयाभोवती या चित्रपटाचे कथानक फिरते असे या चित्रपटाचे दिग्दर्शक गोरान पास्कजेविक यांनी या चित्रपटाच्या कलाकारांसह आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. या विषयावर आधीही अनेक चित्रपट आले आहेत. या कथानकात युरोपमधली जनता शरणार्थीला स्वीकारते की नाही बऱ्याचदा याचे उत्तर नकारार्थीच असते हे मांडण्यात आले आहे. युरोपातील विद्वेषी वातावरणावरील एक रुपक या स्वरुपात त्याची मांडणी करण्यात आली आहे.

शरणार्थीच्या प्रश्नावर स्वत:चे विचार मांडण्याची, सादर करण्याची संधी दिग्दर्शकाने या चित्रपटात घेतली आहे. एखादे एकटे पडलेले मुल मला भेटले तर मी त्याला माझ्याबरोबर घेईन का? की त्याला तसेच सोडेन हा विचार माझ्या मनात आला म्हणूनच हे कथानक आपण विकसित केल्याचे त्यांनी सांगितले.

मेरिलिया ली साची या चित्रपटाच्या निर्मात्यापैकी एक असून, गोरान यांच्या कामाची त्यांनी प्रशंसा केली.

हा चित्रपट म्हणजे मुख्य प्रवाहातला चित्रपट नव्हे तर, हे एक राजकीय निवेदन आहे. हा चित्रपट युरोपातल्या विशेषत: इटलीतल्या मुख्य समस्येवर भाष्य करतो. हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. हा चित्रपट माहितीपटाच्या शैलीतला नाही, तर त्याला काव्यात्मक दृष्टीकोन असल्याचे त्यांनी सांगितले.

या चित्रपटात शरणार्थीची भूमिका साकारणाऱ्या अली मुसा या बालकलाकाराने, गोरान यांनी आपल्याला मदत केल्याचे सांगितले.

शरणार्थींच्या प्रश्नावर तोडगा काय यासंदर्भात विचारले असता यावर एकच मार्ग म्हणजे युद्धे करता कामा नये, असे चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी सांगितले. कोणालाही आपले घर, मित्र आणि संस्कृतीपासून दुरावायचे नसते असे ते म्हणाले.

रस्त्यावर आश्रय घेतलेल्या शरणार्थींची दशा यात दिग्दर्शकाने दाखवली आहे. एका रेस्टॉरंटच्या मालकाला थंडीच्या दिवसात आठ वर्षाचे बालक रस्त्यावर आढळते आणि तो त्याला घरी घेऊन जायचा निर्णय घेतो. या मुलाच्या उपस्थितीवर समाजाच्या कशा प्रतिक्रिया येतात, याचे अभ्यासपूर्ण चित्रण यात सादर करण्यात आले आहे.

देवभूमी या भारतात निर्माण केलेल्या चित्रपटाविषयी गोरान बोलले. हा चित्रपट म्हणजे माझे भारताविषयीचे प्रेम आहे. उत्तराखंडमधे या चित्रपटाचे चित्रिकरण करण्यात आले असून, अतिशय साधे पण भावोत्कट कथानक असलेला हा चित्रपट आहे. भारताविषयीचा आपला स्नेह कसा वृद्धींगत होत गेला हे त्यांनी विषद केले. ॲमेझॉन प्राईमवर हा चित्रपट असून, जगभरातून एक कोटी लोकांचा त्याला प्रतिसाद लाभला आहे.

पारितोषिक प्राप्त सर्बियन दिग्दर्शक गोरान यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. ४४ व्या इफ्फीत ज्युरी म्हणूनही त्यांनी काम केले आहे.