‘दानव’ तयांचे नाव...!

    दिनांक  20-Nov-2019 20:40:43
|
अकर्मा दस्युरभि नोअमन्तुरन्यव्रतो अमानुष
:।

त्वं तस्यामित्रहन्वधर्दासस्य दम्भय॥

(ऋग्वेद-१०.२२.८)अन्वयार्थ-

(अकर्मा) कर्मविहीन, आळशी (अमन्तु:) विचारहीन, विवेकशून्य, (अन्यव्रत:) अनिष्ट, वाईट कामे करणारा, (अमानुष:) अमानवी गुणांचा, मनुष्याला न शोभणार्‍या गुणांना जोपासणारा (अभि) स्वरूपाने (न:) आमचा, समाजाचा, राष्ट्राचा (दस्यु:) शत्रू, दानव, राक्षस आहे.

(अमित्रहन्) हे शत्रुनाशक परमेश्वरा! (त्वम्) तू (तस्य दासस्य) त्या राक्षसाचा, दानवाचा (वध:) दंड देणारा होऊन (दम्भय) त्यांचा नाश कर.


विवेचन

राक्षस, दानव, असुर वा नीच अथवा क्रूर नराधम अशी नावे अगदी पूर्वापार आपल्या ऐकण्यात आहेत. पौराणिक कथा, पोथीपुराण किंवा अन्य सांप्रदायिक ग्रंथातूनही दानवाविषयी बरेच काही ऐकतोच! पण हा कल्पनाविलास खर्‍या अर्थाने पूर्णांशाने आम्हास योग्य तो दिशाबोध करीत नाही. अशा बुद्धीविसंगत गोष्टींमुळे तर्काला जागाच राहत नाही आणि मानव समाज अंधश्रद्धांना बळी पडून भयग्रस्त होतो व अधोगतीला जातो. अशा अंधविश्वासांमुळे जनता विवेकशून्य दु:खाचे जीणे जगते.

वेदांचे विशुद्ध तत्त्वचिंतन यासंदर्भात फारच मौलिक व बोधप्रद असे आहे. दुर्दैवाने या वैदिक विचारांचा अवलंब न केल्यामुळेच समग्र मानव समाज अध:पतनाच्या दिशेने वाटचाल करतो. असुर, दानव, राक्षस म्हणजे अक्राळविक्राळ रूप धारण करणारा अचाट शक्तीचा प्राणी, ज्याचे की हात, पाय, तोंड इत्यादी अवयव महाभयंकर असून त्याच्या दर्शनाने व अभिशापाने मानवाचे जन्मोजन्मीचे नुकसान होते. परिणामी, अशा कपोलकल्पित गोष्टीमुळे सारा भारतीय समाज हा शतकानुशतके शरीर, मन व बुद्धीने शक्तिहीन, विकलांग बनून कायमचा भीतीयुक्त बनला आहे. पण वेदांचा विवेकशील दृष्टिकोन मात्र निश्चितच अशा भयाक्रांतातून बाहेर काढणारा आहे.

राक्षस किंवा दानव कोण असतो? याचे सुंदर विवेचन वरील ऋचेत करण्यात आले आहे. खरेतर राक्षस ही वाईट वृत्ती! या वृत्तीला जोपासणार्‍या माणसाला वेदांमध्ये यातुधान:, रक्षस्, दास:, अमित्रम्, अधम् अशी नावे आली आहेत. याच वृत्तीचा त्याग करण्याकरिता वेदादी शास्त्रांचा मौलिक उपदेश आहे. संपूर्ण दर्शनवाङ्मय वृत्तींचा बिमोड करण्याकरिता प्रेरित करणारे आहे. तर योगशास्त्राचा सारांशदेखील या अनिष्ट वृत्तींना रोखण्याकरिताच आहे. अथर्ववेदातही या वृत्तीपासून दूर राहण्याचा संकेत मिळतो - ‘यातुधानान् वि लापय।’ (दुष्टांना रडवावे.) ‘जहि रक्षस: पर्वतेन।’ (पर्वतस्त्राने राक्षसांना ठार मारावे.)

अशा या वाईट वृत्ती माणसांमध्ये नेहमीच दडलेल्या असतात. त्या सत्पुरुषांनाही बिघडवतात. रावण असो की दुर्योधन! त्यांची दुर्वृत्ती हीच तर विनाशाला कारणीभूत ठरली. वेदांचा ज्ञाता व भाष्यकर्ता रावण हा प्रकांड विद्वान असूनही काम व अहंकार वृत्तीमुळे सोनेरी लंकेसह तो नाहीसा झाला. धर्मतत्त्वांची शिकवण गुरूंकडून घेणारा दुर्योधन हासुद्धा हट्ट, दुराग्रह, क्रोध, लोभ, असूया या वाईट वृत्तींमुळे समग्र कुरुवंशाचा नाशकर्ता ठरला. जगात आजपर्यंत झालेली भयावह युद्धे आणि हिंसक कारवाया या सर्व अशा राक्षसी वृत्तीतूनच उदयास आल्या व मानवाच्या र्‍हासास कारण ठरल्या. म्हणूनच अशा वृत्तींना सतत दूर करण्याकरिता माणसाने प्रयत्नशील असावे. या वाईट वृत्तीचा नायनाट करण्याकरिता ईश्वराची उपासना, त्याचे सान्निध्य, ज्ञानसाधना आणि पुरुषार्थ करावयास हवा. मंत्राच्या उत्तरार्धात परमेश्वराकडे या दुष्ट वृत्तीचा बिमोड करण्याची प्रार्थना करण्यात आली आहे. पण ही प्रार्थना कृतियुक्त हवी. याकरिता सत्यज्ञान, विवेकशक्ती आणि इंद्रियदमन हवे. यम-नियम-आसन-प्राणायामादी आठ योगांगांचे पालन करणे आवश्यक आहे. मंत्राच्या पहिल्या चरणात दानवी (राक्षसी) वृत्तींची जणू काही यादीच वर्णिली आहे. माणूस, दानव बनतो, तो कर्महीनतेमुळे! याकरिता ‘अकर्मा’ हा शब्द आला आहे. आळशी, ऐतखाऊ व कर्महीन माणूस हा ‘स्व’सोबतच इतरांकरितादेखील त्रासदायक ठरतो. कर्मशून्य माणसांमुळे कुटुंब, वंश, समाज व देश रसातळाला जातो. काहीच करावयाचे नाही. केवळ बसून राहायचे, हे तर परावलंबी जगणे. आचार्य भर्तृहरी म्हणतात -

ते मर्त्यलोके भुविभारभूता:।

मनुष्यरूपेण मृगाश्चरन्ति॥

जे विद्या, तप, दान, ज्ञान, शील, सद्गुण, धार्मिकता इत्यादीबाबत प्रयत्नवादी नाहीत, ते या मर्त्यलोकी भूमीला भारभूत आहेत. ते माणूस असूनही साक्षात जनावरांप्रमाणेच जगतात व विचरतात. काबाडकष्ट न करता अगदी सहजपणे सुखसोयी मिळाव्यात, अशी त्यांची धारणा असते. ‘दे रे हरी, खाटल्यावरी।’ ही कर्महीन वृत्ती दु:खाला आमंत्रित करणारी नव्हे का?

‘अमन्तु:’ म्हणजे विवेकशून्य माणूस! असे लोक विचारहीन असतात तेदेखील राक्षसच! कोणतेही काम करावयाचे तर बुद्धी व विचार हवे! मागचा पुढचा विचार न करता जे जगतात, त्यांचे जगणे शोककारक ठरते. कवी भारवी म्हणतो -

‘अविवेक: परमापदां पदम्।’ ‘अविवेक’ हा मोठ्या संकटांना कारणीभूत ठरतो. अन्य एका नीतिकाराने म्हटले आहे - ‘विवेकभ्रष्टानां भवति विनिपात: शतमुखै:।’ म्हणजेच विवेकहीन अशा पथभ्रष्ट माणसांचे शेकडो प्रकारांनी अध:पतन होत असते. म्हणूनच बुद्धिपूर्व कृतीची गरज!

राक्षस बनण्याचे तिसरे कारण म्हणजे ‘अन्यव्रत:’ होणे. ‘अन्यव्रती’ म्हणजे ‘वाईट वृत्ती.’ वाईट प्रवृत्ती घातक ठरते. सत्य, अहिंसा, दया, परोपकार, सेवा, उपासना या वृत्तींना धारण करणारे लोक देव बनतात. या विपरीत जे अनिष्ट गोष्टी म्हणजेच लबाडी, हिंसा, क्रूरता, क्रोध, कृतघ्नता इत्यादी दोषांना बाळगतात व सत्य तत्त्वांपासून दूर जातात, ते अन्यवृत्ती होतात. यामुळे दैवीगुणांपासून ते दूर होऊन राक्षसी वृत्तींना धारण करणारे बनतात. अशा दोषांनी ग्रासलेले राक्षस लोक समाज विघातक ठरतात. म्हणून अशा दुष्टांना संपविण्याकरिता ईश्वराकडे कामना केली आहे. ‘हे भगवंता! तू अमित्रांना (शत्रूंना) नष्ट करणारा आहेस. समाजातील या क्रूर राक्षसांना संपविण्याचे सामर्थ्य तुझ्यात आहे.’

मनुष्य म्हणजे मननपूर्व काम करणारा. जो माणुसकीला काळीमा फासणारी, चोरी, खून, बलात्कार, भ्रष्टाचार अशी कामे करतो, तो माणूस नव्हे तर नक्कीच राक्षस!

अशा वाईट वृत्तींना त्यागून माणसाने आपली वाटचाल ‘दानवतेकडून मानवतेकडे’ आणि त्याही पुढे दिव्यत्वाकडे ठेवावी, जेणेकरून माणसाचे जीवन यशस्वी ठरेल. असे हे उत्तम प्रकारचे जगणे म्हणजेच मानवधर्म जोपासणे होय.


-प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य