‘धर्मरक्षी’ राजाचा शोध

    दिनांक  20-Nov-2019 21:04:22
|रामदासांनी लोकांच्या धार्मिक विचारांची दिशा बदलून त्याला योग्य वळण दिले. रामदासस्वामी नुसतेच मारुती मंदिरे स्थापन करून रामजन्मोत्सव साजरे करीत नव्हते; तर त्यांना ‘धर्मरक्षी’ अशा राजाचा शोध घ्यायचा होता.

इसवी सन १६४४ च्या सुमारास तीर्थयात्रेच्या निमित्ताने १२ वर्षे पायी केलेले देशाटन संपवून रामदासस्वामी आपल्या नियोजित कार्यासाठी कृष्णातिरी आले. कृष्णेच्या खोर्‍यातील काही गावांची निवड करून रामदासांनी मारुती मंदिरे स्थापन केली. लोकांना भक्तीबरोबर शक्तीच्या उपासनेला लावले. लगेच पुढच्या वर्षी मसूरला आल्यावर रामजन्मोत्सव साजरा केला. मुसलमानांच्या आमदनीत मूर्तिपूजा करणे, देवळे बांधणे, जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करणे, हिंदू देवदेवतांचे उत्सव साजरे करणे यावर बंदी होती. तसे करणे हा गुन्हा समजला जाई. पण रामदासांनी अशा धमक्यांना भीक घातली नाही. इ. स. १६४८ ला रामदासांनी पहिला रामजन्मोत्सव चाफळला मोठ्या प्रमाणावर केला. त्यानिमित्ताने आजूबाजूचे लोक एकत्र आले. हिंदू समाजातील लोक एकत्र येऊन आपल्या धर्माबद्दल विचार करू लागले. आतापर्यंत लोक फक्त पीराला नवस करीत होते व मुसलमानांचे उरूस साजरे करीत होते. रामदासांनी लोकांच्या धार्मिक विचारांची दिशा बदलून त्याला योग्य वळण दिले. रामदासस्वामी नुसतेच मारुती मंदिरे स्थापन करून रामजन्मोत्सव साजरे करीत नव्हते; तर त्यांना ‘धर्मरक्षी’ अशा राजाचा शोध घ्यायचा होता. तसेच सभोवताली कोणते राजकारण घडत आहे. यावर त्यांची बारकाईने नजर होती.

कृष्णा खोर्‍यात उतरल्यावर त्यांची पहिली नजर ‘चंद्रराव मोरे’ यांच्याकडे गेली. सह्याद्रीचा बराचसा भाग व गड त्याच्याकडे होते. चंद्रराव मोरे वाघाची समोरून शिकार करीत असत, असे रामदासांच्या कानावर आले होते. रामदासांनी चंद्ररावांची चहुबाजूंनी माहिती काढल्यावर त्यांच्या लक्षात आले की, हा आपली शक्ती लोकांना छळण्यासाठी व नाडण्यासाठी वापरतो आहे. तसेच चंद्रराव पातशाहीचा गुलाम झालेला आहे. जावळी खोर्‍यात त्याचे वर्चस्व होते. त्याचा त्याला गर्व होता. तो म्हणतो, ‘येता जावळी जाता गोवळी’ म्हणजे आमच्या विरोधात कोणी जावळीत आला तर तो जीवंत परत जाणार नाही. त्याप्रमाणे तेथील बाजी घोरपडेही शूर होता. पण विजापूरचा दरबारचा सच्चा सेवक होता. रामदासांनी ओळखले की, हे दोघेही शूर आहेत, पण आपल्या कामाचे नाहीत. कारण, यांच्या अंगी अनीती व विजापूर दरबारची गुलामगिरी पुरेपूर भिनलेली आहे. मुसलमानांच्या दरबारी कुर्निसात करून आपले जीवन त्या दरबारी वाहणार्‍यांचा काही उपयोग नाही, हे रामदासांनी ताडले. त्यांचे मन या शूर मराठा सरदरांबाबत खट्टू झाले.

वास्तविक पाहता चाफळचा रामजन्मोत्सव सुरू झाला तेव्हा बाजी घोरपडेने काही जमीनी उत्सवासाठी इनाम करून दिल्या होत्या. पण त्याची विजापूरच्या तख्ताची गुलामगिरी रामदासांना आठडणारी नव्हती. रामदासांनी त्या भागात ११ मारुतींची स्थापना करून रामोपासनेच्या प्रसाराचा धडाका लावला होता. त्याचवेळी इकडे पुणे प्रांतात रोहिडेश्वरापुढे हिंदवी स्वराज्याची शपथ घेऊन आसपासचे किल्ले घेण्यास शिवबाने सुरुवात केली होती. महाराष्ट्रातील अत्यंत बिकट व बळकट तोरणा किल्ला शिवाजी महाराजांनी सर केला होता. प्रथम त्यांनी या किल्ल्याची पाहणी केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, बादशहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नाही. त्याचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी ‘तोरणा’ ताब्यात घेतला. तटबंदी थोडी दुरुस्त करायला हवी होती. दुरुस्ती करीत असताना तिथे धनाचा हंडा सापडला. तो शुभशकुन समजून महाराजांनी त्या द्रव्याचा वापर करून मुरुंबदेवाच्या गडाची दुरुस्ती करून घेतली. त्यानंतर शिवाजी महाराजांनी त्या गडाचे नाव ठेवले ‘राजगड.’ बादशहाने दुर्लक्षिलेले महाराष्ट्रातील गडकिल्ले महाराजांनी एका मागून एक घेण्याचा सपाटा लावला. मुसलमानी सुलतानशाहीला ती एक चपराक होती. शिवरायांनी हिंदवी स्वराज्यासाठी ‘तोरणा’, ‘राजगड’, ‘सिंहगड’ किल्ले घेतले. शिवबा लहानपणापासून शूर, धाडसी, कल्पक तसेच न्यायप्रिय होते. रांझे गावच्या पाटलाने केलेल्या अत्याचाराबद्दल १६ वर्षांच्या शिवबाने पाटलाचे हातपाय तोडायची शिक्षा सुनावली. पाटलांची रदबदली करायला आलेल्या लोकांना शिवबाने सांगितले की, पाटलाला त्याच्या हीन दुष्कृत्याबद्दल मी शिक्षा सुनावली. त्याचा पुनर्विचार शक्य नाही. पाटलाचे हातपाय तोडले गेलेच पाहिजे, हा सारा वृत्तांत समर्थ रामदास स्वामींच्या कानावर येत होता. त्यामुळे साहजिकच ज्या धर्मरक्षी राजाच्या शोधात समर्थ बारा वर्षे पायी हिंदुस्थानभर फिरले, त्याचा शोध लागला, असे समर्थांना वाटले. समर्थांचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्र होते आणि समर्थांचे कार्यक्षेत्र रामोपासना रामराज्य होते. रामचंद्राच्या अंगी असलेल्या गुणांचे, शौर्यांचे स्फुल्लिंग त्यांना शिवरायांत दिसू लागले.

शिवराय नुसते धैर्यवान राजकारणी नव्हते, तर त्यांचा पिंड प्रभू रामचंद्रासारखा धर्मपुरुषाचा होता. शिवरायांचे राजकारण धर्मरक्षणासाठीच होते, हे रामदासांच्या सूक्ष्म नजरेतून सुटले नव्हते. शिवराय जरी राजकारणातील खलबते, लढाया यात गुंतले होते तरी शिवाजी महाराजांनी धार्मिक विचार, रामराज्याचा आदर्श, कीर्तने आणि पुराणे ऐकणे याची आवड जोपासली होती. पराक्रमी, धाडसी, रयतेची काळजी घेणारे, रयतेवर स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम करणारे, अत्याचारी, अन्यायी, पातशाही विरुद्ध लढणारे हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे शिवराय पाहून रामदासांना त्यांच्याविषयी आत्मीयता वाटू लागली. इकडे धार्मिक पातळीवर हिंदू समाज एकत्र आणून लोकांना शक्तीची व सत्त्वगुणाची उपासना करायला शिकवणार्‍या आणि चाफळला रामजन्मोत्सव धाडसाने साजरा करणार्‍या रामदासांच्या बातम्या हेरांकरवी शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचत होत्या. महाराजांच्या मनातही होते की, आपण रामदासांची भेट घेतली पाहिजे. चाफळचे राम मंदिर बांधण्यासाठी काहीतरी मदत दिली पाहिजे. या विचाराने शिवाजी महाराज चाफळला गेले. पण, त्यांची व रामदासांची भेट झाली नाही. चाफळ खोर्‍यातील चाफळचे मामलेदार नरसोमल अंबरखाने यांनी महाराजांना सांगितले की, रामदासस्वामी कायमस्वरुपी चाफळ मठात राहत नाहीत. त्यांचा मुक्काम जवळच्या अरण्यातील एखाद्या घळीत असतो. उत्सवाच्या वेळी अथवा काही कामासाठी ते चाफळमठात येतात. रामदास चाफळला राममंदिर बांधत होते. त्यासाठी अर्थसाहाय्य करावे, या उद्देशाने महाराज म्हणाले, "रामदासस्वामी या भागात राहत असूनही आमच्याकडून मंदिरासाठी काही सेवा झाली नाही?" त्यावर नरसोमल म्हणाले, "महाराजांकडून ३०० होन पोहोचले आहेत." नरसोमल यांनी खुलासा केला की, शिरीगोसावी यांचे कीर्तन ऐकल्यावर महाराजांनी त्यांना तीनशे होन बिदागी दिली. पण, त्या प्रामाणिक गोसाव्याने ती नाकारली आणि समर्थ रामदास चाफळास राममंदिर बांधत आहे. त्यांना ते पाठवावेत, असे सांगितले. त्याप्रमाणे आपणाकडून आलेले ३०० होन राममंदिरासाठी रामदासांकडे सुपूर्द करण्यात आले. ते ऐकल्यावर शिवाजी महाराजांनी आणखी ७०० होन दिले व सांगितले की, देवालयास उपद्रव होऊ नये म्हणून मांड नदीवर आणि हणमंत ओढ्यावर बंधारा बांधावा.

रामदासस्वामी नेमके कोणत्या घळीत असतील, याचा कृष्णेच्या खोर्‍यात शोध घेणे शक्य नव्हते. स्वामी जाण्याचे स्थळ कोणाला सांगत नसत. त्यामुळे स्वामींच्या भेटीचा योग नाही. पुढे केव्हातरी हा योग येईल, असे समजून शिवाजी महाराजांनी चाफळहून पुढे कूच केले.

सुरेश जाखडी