कोरेगाव भीमा साक्षीपुरावे चौकशी आयोगासमोर उलगडणार

19 Nov 2019 16:24:24


 

कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने साक्षीपुरावे नोंदविण्याचे काम चालू ठेवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार साक्ष नोंदविण्याचे काम २५ ते २८ नोव्हेंबर २०१९ या कालावधीमध्ये आयोगाच्या मुंबई कार्यालयात होणार आहे. त्यानुसार सुरुवातीला ज्या साक्षीदारांची साक्ष घ्यायची आहे, त्यांना समन्स काढण्यात आल्याचे कोरेगाव भीमा चौकशी आयोगाच्या सचिवांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगिले आहे.

सुनावणीचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या सूचनाफलकावर प्रसिद्ध झाला आहे. आयोगाच्या मुंबई आणि पुणे येथील कार्यालयात घेण्यात येणाऱ्या पुढील सुनावणीचा कार्यक्रम आयोगाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध केला जाईल. ज्या साक्षीदारांना साक्षीसाठी बोलावण्यात आले आहे, त्यांची नावेसुद्धा माहिती आयोगाच्या कार्यालयात सूचना फलकांवर लावण्यात येणार आहेत.

१ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे घडलेली अनुचित घटना आणि त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेवर झालेला दुष्परिणाम विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने या घटनेची चौकशी, संदर्भ अटीनुसार करण्यासाठी चौकशी आयोगाची स्थापना केली.

११ मे २०१८ आणि १५ जून २०१८ रोजीच्या जाहीरनाम्याद्वारे शपथपत्राच्या स्वरुपात निवेदने मागवण्यात आली होती. त्यानंतर आयोगासमोर पुरावे नोंदवण्याचे काम सुरु आहे. दरम्यान आयोगाचा अहवाल सादर करण्यासाठीची मुदत वेळोवेळी वाढवून देण्यात येऊन वाढीव मुदत ८ नोव्हेंबर २०१९ रोजी संपली. गृह विभागाने PRO-०२१८/प्रका/७०ब/विशा/२/ ८ नोव्हेंबर २०१९ द्वारे आयोगास अहवाल सादर करण्याची मुदत ८ फेब्रुवारी २०२० पर्यंत वाढवून दिली आहे.

Powered By Sangraha 9.0