नाशिक महापौरपदासाठी उद्या अर्ज दाखल होणार

19 Nov 2019 20:50:38
 


नाशिक : महापौरपदासाठी बुधवारी (दि. २०) उमेदवारी अर्ज दाखल होणार असून त्यामुळे राजकिय हालचाली शिगेला पोहोचल्या आहेत. भाजपबरोबरच शिवसेनेचे संभाव्य उमेदवार बुधवारीच स्पष्ट होणार असून त्यानंतर राजकिय समिकरणे आणखी बदलण्याची शक्यता आहे. भाजपात तीन ते चार नगरसेवकांची नावे अंतिमत: चर्चेत आहेत तर शिवसेनेत देखील दोन नावांवर अंतिम चर्चा सुरू आहे.

 

कोणत्याही पक्षाच्या वतीने अंतिमत: उमेदवारी घोषीत झालेली नसली तरी अर्ज दाखल करण्यासाठी संभाव्य उमेदवार किंवा एकाच उमेदवाराला अर्ज दाखल करण्याची संधी देण्यात येणार आहे. भाजपच्या वतीने शिवाजी गांगुर्डे, हिमगौरी आडके, दिनकर पाटील, सतीश कुलकर्णी, अरूण पवार, जगदीश पाटील, गणेश गिते यांच्यासह अनेकांची नावे चर्चेत असली तरी पक्षाचे नेते आणि माजी पालकमंत्री गिरीश महाजन हे सर्वांचे मत ऐकून निर्णय घेणार आहेत.

 

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसारच संभाव्य उमेदवारांना अर्ज दाखल करण्यास सांगण्यात येणार असून त्यानुसार अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. भाजप बरोबरच शिवसेनेच्या वतीने देखील उमेदवारीची धावपळ सुरू असून अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, विलास शिंदे आणि सत्यभामा गाडेकर यांच्या पैकी एकावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.
Powered By Sangraha 9.0