तानाजीच्या शौर्याची झलक पहा या ट्रेलरमध्ये

    दिनांक  19-Nov-2019 14:12:59
|


 

ओम राऊत दिग्दर्शित 'तान्हाजी-द अनसंग वोरीयर' या चित्रपटाचा बहुचर्चित ट्रेलर आज प्रदर्शित झाला. भव्यता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मराठ्यांच्या पराक्रमाची एक झलक दर्शवणारा असा हा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि सोशल मीडियावर याविषयी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे ट्रेलरमधील डायलॉग प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतील. दिग्दर्शक ओम राऊत यांनी देखील ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला.

 

अजय देवगण, सैफ अली खान आणि काजोल अशी बडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. येत्या काळात प्रदर्शित होणाऱ्या 'पानिपत', 'फत्तेशीकस्त' यांसारख्या काही ऐतिहासिक पटांपैकी हा देखील एक महत्वाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

दरम्यान याआधी प्रकाशित करण्यात आलेल्या 'तान्हाजी-द अनसंग वोरीयर' या चित्रपटातील भूमिकांची झलक प्रेक्षकांसमोर आली आहे. १७ व्या शतकातील मराठा सैन्यातील बहादूर सेनापती तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणारा अजय देवगण, त्यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारणारी काजोल आणि खलनायक राजा उदयभान सिंह याची भूमिका साकारणारा सैफ आली खान यांच्या पोस्टर्सना प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.

या व्यतिरिक्त चित्रपटात शरद केळकर, जगपथी बाबू, देवदत्त नागे, पंकज त्रिपाठी, नेहा शर्माअजिंक्य देव, कैलास वाघमारे, हार्दिक संगणी, लुक केनी आणि विपुल गुप्ता यांच्या देखील महत्वाच्या भूमिका असणार आहेत. विशेष म्हणजे हा चित्रपट ३ डी असल्याने चित्रपट आणखीनच आकर्षक होईल. येत्या १० जानेवारीला चित्रपट प्रदर्शित होईल.