संत नामदेवाच्या पालखीमध्ये जेसीबी ; मृतांमध्ये संत नामदेवांचे वंशज

    दिनांक  19-Nov-2019 13:06:34
|


 


पुणे : मंगळवारी सकाळी पुण्यामध्ये संत नामदेव महाराजांची पालखी घेऊन जाताना वारकऱ्यांवर काळाने घाला केला. सासवड-पुणे रस्त्यावरील दिवेघाटात नामदेव महाराज पालखी सोहळा जात असताना या दिंडीत जेसीबी घुसला. यामध्ये १७ वारकरी जखमी झाले असून २ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये नामदेव महाराजांचे १७ वे वंशज ३६ वर्षांचे सोपान महाराज नामदास आणि त्यांच्यासोबत असलेला २४ वर्षीय विद्यार्थी अतुल महाराज आळशी यांचा समावेश आहे.

 

अपघात जखमी असलेल्या वारकऱ्यांवर हडपसरमधील नोबेल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये २ वारकऱ्यांची प्रकृती अजूनही गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. आळंदीत होणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन सोहळ्या निमित्त कार्तिकी वारीसाठी हे वारकरी आळंदीला जात होते. जेसीबीचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व जेसीबी दिंडीत घुसून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोन वारकऱ्यांच्या वारसांना भारतीय जनता पक्षातर्फे प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या शस्त्रक्रियेसह सर्व उपचारांचा खर्च भाजपातर्फे करण्यात येईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

चंद्रकांतदादा पाटील यांनी कार्तिकी वारीतील अपघातामध्ये जखमी झालेल्या वारकऱ्यांची पुण्यातील हडपसर येथील नोबेल हॉस्पिटल मध्ये जाऊन विचारपूस केली. संत नामदेव महाराजांचे वंशज सोपान महाराज नामदास आणि अतुल महाराज आळशी यांचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना भाजपातर्फे प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केले. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या शस्त्रक्रियेचा आणि रुग्णालयातून घरी गेल्यानंतर होणारा औषध उपचारांचा खर्च भाजपातर्फे करण्यात येईल, असेही प्रदेशाध्यक्षांनी सांगितले.