सीपीआयएमचा धोका वेळीच ओळखणे आवश्यक : कॅ. स्मिता गायकवाड

    दिनांक  19-Nov-2019 20:30:47
|


 


'भारतीय विचार मंच'तर्फे आयोजित कार्यक्रमात केले प्रतिपादन

 
 

नाशिक : मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया अर्थात सीपीआयएम ही एक विघातक आणि समाजात अशांतता पसरविणारी संघटना आहे. या संघटनेचा धोका आपण वेळीच ओळखणे आवश्यक असल्याचे मत कॅ. स्मिता गायकवाड यांनी केले. त्या मालेगाव येथे दि. १७ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या व 'भारतीय विचार मंच'तर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'शहरी नक्षलवाद' या विषयावरील कार्यक्रमप्रसंगी बोलत होत्या.

 

मालेगाव येथील रोमा सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी संयोजक रवींद्र दशपुते, भाजपचे जिल्हा नेते सुरेश नाना निकम, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका सहकार्यवाह कांकरिया, माजी तालुका सहकार्यवाह बन्सीलाल कांकरिया, प्रदीप बच्छाव, प्रल्हाद शर्मा, हरिप्रसाद गुप्ता, सतीश कजवाडकर, रामनिवास सोनी, रुपेश कांकरिया, बापू सोनवणे, बाळासाहेब वडगे, दादाजी वाघ, नितीन पोफळे, राजेश गंगावणे, शरद दुसाने, जगदीश गोर्‍हे, उत्तमराव पाटील, विजय पोफळे, भरत पोफळे, रविश मारू हे मान्यवर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना कॅ. गायकवाड म्हणाल्या की, ''गृहखात्याच्या मार्फत आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक घातक संघटना म्हणून सीपीआयएमची नोंद आहे." "पूर्वी छत्तीसगढ, गडचिरोली, दंडकारण्य अशा जंगलप्रवण भागात आपले कार्य करणार्‍या या संघटनेची पाळेमुळे आता शहरी भागात पसरू लागली आहेत. त्यासाठी आपला मूळ चेहरा बदलून ही संघटना आपले काम करत आहे.सीपीआयएममुळे शहरी भागाला धोका पोहोचण्याचा संभव असून यासाठी शहरात वास्तव्यास असणार्‍या नागरिकांनी सतर्क राहावे." वनवासी बांधवांना विकास नको आहे, असा प्रचार जो माओवाद्यांकडून केला जातो, तो सपशेल चूक असल्याचे कॅ. गायकवाड यांनी यावेळी सांगितले. "वनवासी बांधवांना विकास हवा असून आपल्या तळांजवळ पोलीस किंवा शासनास जलद पोहोचता येऊ नये म्हणून माओवादीच वनवासींची जीवनरेषा असलेली विकासकामे भूसुरुंगाद्वारे उद्ध्वस्त करतात," असे कॅ. गायकवाड यांनी सांगितले.

 

"नक्षलग्रस्त भागातील होणार्‍या शिक्षकांच्या हत्या, शाळांना लावण्यात येणार्‍या आगी हे वनवासींच्या जीवनात समृद्धी येऊ नये यासाठी माओवादी करत असलेल्या कार्याचेच द्योतक असल्याचे कॅ. गायकवाड यांनी यावेळी सांगितले. शहरी भागात वनवासी चळवळीचे आम्ही मसिहा आहोत, असे दर्शवणारे हे लोक प्रत्यक्षात वनवासीच्या जीवनाला नरकसदृश स्थितीत नेत आहेत," असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंजुषा कजवाडकर यांनी केले तर, परिचय रागिणी भेलसेकर यांनी करून दिला. भारतमातेच्या गीताने भावना पोफळे यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली.