आम्ही वाचनसंस्कृतीचे संस्थापक आणि प्रचारक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2019   
Total Views |



कल्याण शहरालाऐतिहासिक शहर’ म्हणून संबोधले जाते. या शहराच्या ऐतिहासिक खुणा काहिशा पुसट झाल्या आहेत. मात्र, वाचन संस्कृती वृद्धिंगत करणारा एक ऐतिहासिक वारसा आजही आपली साक्ष देत कल्याणमध्ये पाय रोवून उभा आहे. ‘ग्लोबलायझेशन’च्या या जमान्यात आपल्यात नवेपण अंगी घेऊन जुन्या आठवणी जपत कल्याणमधील सार्वजनिक वाचनालय, कल्याण गेले दीड शतक कल्याणमध्ये कार्यरत आहे.

कल्याण शहरात पांडवांच्या काळातील पाऊलखुणा पाहावयास मिळतात. कल्याण हे एतिहासिक शहर. इतिहासाच्या अनेक पाऊलखूणा कल्याण शहराने जोपासललेल्या. यापैकीच एक म्हणजे ‘सार्वजनिक वाचनालय, कल्याण’ होय. ‘सार्वजनिक वाचनालय’ म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या वाचनालयांमधील महत्त्वाचे वाचनालय. या वाचनालयामध्ये काम केलेल्या मंडळींपैकी फारच कमी मंडळी आज हयात असतील. १८५७ च्या राष्ट्रीय उठावानंतर ब्रिटिश शासनाने प्रचंड दडपशाही करून आपले शासन स्थिर केले. पुन्हा उठाव होऊ नये म्हणून भारतीय लोकांना शासनात सामील करून घेण्याचा प्रयत्नही करण्यात आला. यादरम्यान इंग्रजी शिक्षणाचा प्रसार वेगाने सुरू केला. अशा पारतंत्र्यात कल्याणमध्ये सार्वजनिक वाचनालयाचा पाया रचला, तो सदाशिव मोरेश्वर साठे या सुशिक्षित आणि घरंदाज व्यक्तीने.

पुण्याजवळील शेडानी गावात (आज हे गाव मुळशी धरणाखाली गेले आहे) मोरेश्वर जनादर्न साठे हे संस्कृत पंडित राहत होते. घराण्याची भिक्षुकी ते परंपरेने चालवत. त्यांच्या घरात दि. ३ सप्टेंबर, १८२७ रोजी सदाशिवचा जन्म झाला. त्या काळातील शिक्षणपद्धतीनुसार प्राथमिक शिक्षण त्यांनी आपल्या घरीच घेतले. यानंतर इंग्रजी शिक्षणाची ओढ लागल्याने व वडील इंग्रजी शिकू देणार नाही, ही भीती मनात ठेवून त्यांनी घरातून पळ काढला. चाकणला प्रसिद्ध वकील महादेवशास्त्री आपटे यांच्याकडे आश्रय घेत इंग्रजीतील शिक्षण पूर्ण केले. १ मे, १८५५ रोजी कल्याण, मुंबई व पुढचे कसारा-पुणे रेल्वेचे काम सुरू झाले होते. याच काळात साठे यांची बदली कल्याणला झाली व ते सहकुटुंब कल्याणला खाटिक आळी नाक्यावर वास्तव्यास आले. हा काळ कल्याणचे महत्त्व वाढविणारा काळ होता.


१८६४ साली सदाशिव भाऊ कल्याणलाच मामलेदार म्हणून आले
. या काळात ते स्थानिक कार्यात मदत करीत कल्याण पालिकेच्या अडीअडचणी सरकार दरबारी सोडविण्यासाठी मदत करीत. त्यांना स्वतःला शिक्षणाची व वाचनाची आवड असल्याने कल्याणमधील मराठी शाळेला भेट देत. मोठमोठ्या पदावर नोकरी करीत असतानादेखील त्यांनी आपली वाचनाची आवड ही तितक्याचे आत्मियतेने जोपासली. ते चांगली पुस्तके घेत व वाचून काढीत. सार्वजनिक वाचनालय ही संकल्पना त्या काळात जास्त प्रचलित नव्हती. शिक्षण घेण्याची प्रवृत्ती कमी असल्याने वाचन संस्कृतीचा फारसा संबंध नव्हता तरी कल्याणचा विकास होत असल्याकारणाने सुशिक्षित घराणी येथे वाढत असल्याने पुस्तके वाचण्याची ओढ येथे वाढली. यादरम्यान सर्वांनी पुस्तके वाचावी, या हेतूने १८६४ साली आपल्या राहत्या घरी तात्पुरते वाचनालय त्यांनी सुरू केले. १८७९-८० मध्ये वाचनालयामध्ये ३३५ ग्रंथ, ४३ सभासद, चार इंग्रजी व पाच अन्य भाषिक वर्तमानपत्रे, चार मासिके होती. हा इतिहास ठाणे गॅझेटिअरच्या पुस्तकात सापडला आहे . १५५ वर्षे जुने वाचनालय कल्याणकरांच्या अभिमानात भर घालीत आहे.

साठेंनी आपल्याकडील बरीच पुस्तके कल्याणमधील मराठी शाळेला भेट दिली. भाऊंच्या वाचनालयातून पुस्तके नेण्यासाठी अनेक ग्रंथप्रेमी येत असत. काहींना आवड असूनही एवढ्या मोठ्या माणसाच्या घरी जाण्याचा संकोच वाटे. मात्र, या सर्व परिस्थितीची जाणीव भाऊंना झाली व वाचनालय घराबाहेर आणून सार्वत्रिक करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी पारावरील (आताचे पारनाका) येते. दामोदर गणेश जोशी यांच्या जागेत वाचनालय सुरू करण्याचे ठरले. दामोदर जोशी हे डॉ. आनंदी गोपाळ जोशी (देशातील पहिल्या महिला डॉक्टर) यांचे थोरले बंधू, जोशीच्या जागेत वाचनालय स्थलांतरीत करण्यात आले व त्या काळी या वाचनालयाला ‘टाऊन लायब्ररी’ म्हणत.

नवीन जागेत वाचनालय सुरू झाल्यानंतर मासिक वर्गणी एक रुपया ठरविण्यात आली. ही संकल्पना त्यांची होती आणि पुस्तकेही त्यांचीच होती. पण तरीसुद्धा त्यांनी या वाचनालयासाठी मासिक वर्गणी दिली. १८७८ पासून दरमहा एक रुपया देणारे वाचनालयाचे वर्गणीदार अशी नोंद असल्याने वाचनालयाची स्थापना ३ फेब्रुवारी, १८७८ रोजी असल्याचे समजले जाई. मात्र, या विषयावर काही लोकांनी शोध घेऊन ही घटना खोडीत या वाचनालयाची स्थापना १८६४ मध्ये झाली असल्याचे सांगितले.

२६ ऑगस्ट, १८८५ साली कल्याण नगरपालिकेची पहिली निवडणूक झाली. या दरम्यान कल्याणच्या पहिल्या नेटिव्ह नगराध्यक्षपदाचा मान रावसाहेब सदशिव मोरेश्वर साठे यांना मिळला. पण १८८८ मध्ये काही कारणास्तव राजीनामा दिला व पुन्हा १८८९ मध्ये त्यांना नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला. यावेळी साठेंच्या मनात वाचनालयाच्या स्थैर्यासाठी विचार सुरू झाला व पारावरचे वाचनालय नगरपालिकेच्या परिसरात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. १८८४ मध्ये जोशींच्या जागेतील वाचनालय पालिकेसमोरील नवीन इमारतीत आले. ही इमारत किंवा वाचनालयाची वास्तू तयार करण्यात साठेंप्रमाणे त्यावेळचे मामलेदार सीताराम दामोदार ओवळेकर व गावातील काही प्रतिष्ठीत मंडळींनी प्रयत्न केले. त्यावेळेच्या मान्यवर मंडळींनी यावेळी उपस्थिती दर्शवली. दरम्यान, यानंतर १८९५ ते १८९८ या काळात वाचनालयाचे काम गतिमान होऊ शकले नाही. यासाठी कारणीभूत ठरली, त्याकाळी आलेली ‘प्लेग’ची साथ. दरम्यान, याच काळात १८९८ मध्ये वाचनालयावर शोककळा पसरली. वार्धक्यामुळे वाचनालयाचे प्रेरणास्थान असणार्‍या रावसाहेबांचे निधन झाले व वाचनालयाला उतरती कळा लागली. १८९८ पासून पुढे १० ते १२ वर्षे वाचनालय कसेबसे सुरू होते.

या संकटाच्या काळात वाचनालयाला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी रामचंद्र कृष्ण सबनीस हे वाचनालयाचे अध्यक्ष, प्रभाकर काशिनाथ ओक, खजिनदार, गोविंद वासुदेव भिडे, चिटणीस यांनी वाचनालयाची स्थिती सुधारण्यासाठी धडपड करीत होते. १ एप्रिल, १९५१ साली संस्थेला मुक्तदार वाचनालय म्हणून मान्यता मिळाली. सद्यस्थितीला संस्थेच्या तीन शाखा आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या समोरील छत्रपती शिवाजी चौकातील मुख्य शाखा व रामबाग परिसरात दोन शाखा आहेत. यात १ ऑक्टोबर रोजी रामबागची शाखा स्थापन करण्यात आली, तर बालकांच्या आवडी जपण्यासाठी १ मे, १९७७ रोजी ‘बालविभागा’चा शुभारंभ करण्यात आला. लेखक-वाचक यांचा संवाद वाढवा, यासाठी शतकोत्तर रौप्य महोत्सवी व्याख्यानमालेची सुरुवात करण्यात आली. या व्याख्यानमालेला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षात ‘पु. भा. भावे व्याख्यानमाले’ची सुरुवात करण्यात आली. यासाठी महापालिकेकडून मदत घेण्यात आली. यानंतर माजी आमदार हरिश्चंद्र पाटील यांच्या निधीतून संगणक भेट देण्यात आला.



 

कित्येक वर्षे अनेक अडचणींवर उपाययोजना करीत वाचनालय आपली दीडशे वर्षं पूर्ण करत काम करीत आहे. यात आता संस्थेने ग्रंथालय आणि वाचक यांच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने दरी साधण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या पद्धतीने होत असून कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाने अ‍ॅण्ड्रॉईड अ‍ॅपच्या मदतीने वाचकांना जोडण्याचे केले आहे. ‘सावाक’ असे या अ‍ॅपचे नाव असून वाचनालयाच्या संकेतस्थळावर ते उपलब्ध करून देण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी यांनी पुढाकार घेऊन वाचनालयाचे अ‍ॅप तयार करण्याचा निर्णय घेतला. नाशिक येथील ‘युनिक्य कॉम्प्युटर’ या संस्थेच्या शेखर जोशी आणि अजित सम्पधरे यांनी ग्रंथालयाचे अ‍ॅप तयार केले. सध्या हे अ‍ॅप वाचनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून सभासदांना ते मोबाईलमध्ये डाऊनलोड करता येते. हा अ‍ॅप ‘प्ले स्टोअर’वर उपलब्ध करून देण्यासाठी तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात आल्या असून लवकरच तो ‘प्ले स्टोअर’वरसुद्धा उपलब्ध होऊ शकणार आहे. ग्रंथालयातील सुमारे ७० हजारांहून अधिक पुस्तकांचा शोध घेता येऊ शकतो. वाचनालयात दाखल झालेल्या नव्या पुस्तकांची यादी मिळेल. वाचनालयातील दुर्मीळ पुस्तकांची नोंद या अ‍ॅपवरून मिळू शकणार आहे. सभासदांच्या पुस्तकासाठी नोंदणी करण्याबरोबरच पुस्तकाची मुदत वाढण्यासाठी इथे सोय करण्यात आली आहे. या माध्यमातून सभासदांशी जोडणारे पहिले ग्रंथालय आहे.

येत्या काळात शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता संस्थेचा विस्तार करण्याचा मानस आहे. वाचक चळवळ वाचकांच्या दारात नेण्यासाठी फिरत्या वाचनालयाची संकल्पना राबविणे, कल्याण शहराचा नाव लौकिक व्हावा या दृष्टीने साहित्य पुरस्कार देणे, अशा संकल्पना आहेत. या तीनही शाखांमध्ये मिळून सुमारे १६ कर्मचारी काम करीत आहेत. सभासदांची वर्गणी व शासनाचे तुटपुंजे अनुदान या माध्यमातून संस्थेची आर्थिक वाटचाल सुरू आहे. या ठिकाणी सुमारे ७० हजारांच्या आसपास पुस्तके आहेत, तसेच ‘विद्यार्थी चालवत आहेत वाचनालय’ हा अभिनव उपक्रम या माध्यमातून सुरू आहे. सद्यस्थितीला संस्थेची साडेतीन हजार सभासद आहेत. साहित्य व भाषा जपणे, त्यांचे संवर्धन करणे ही वाचनालयाची जबाबदारी असून त्या माध्यमातून काम होणे अपेक्षित आहे. वाचक टिकवण्यापेक्षा तो घडवला पाहिजे, असा विचार येथील संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी सातत्याने करतात व त्या दृष्टीने त्यांचे व सार्वजनिक वाचनालयाचे काम सुरू आहे.


 

@@AUTHORINFO_V1@@