चाईल्ड सेफ्टी फोरम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2019
Total Views |


‘एम पूर्व’ विभागामधील मुलांच्या व महिलांच्या संरक्षणाच्या संदर्भात ‘एम पूर्व’ विभागामध्ये कार्यरत संस्थां एकत्र आल्या. नशा, छेडछाड, कुपोषण, मुलांचे होणारे शोषण, महिलांच्या व मुलांच्या आरोग्याचा प्रश्न तसेच शोषणापासून मुलांचे संरक्षण, विकास, आरोग्य, सहभागीता मुद्द्यांवर मुलांसाठी हिंसामुक्त व सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी ‘चाईल्ड सेफ्टी फोरम’ ची स्थापना केली.

‘एम पूर्व’ विभाग म्हणजे कुर्ला वगैरेचा परिसर. ‘कुर्ला नामही काफी हैं’ असे उपनगर. गुन्हेगारीचे नित्य स्वरूप इथे गुण्यागोविंदाने स्थापित होत असते. गुन्हेगारांच्या कचाट्यात सहजपणे सापडतात त्या महिला आणि बालके. संविधानाने महिलांना, मुलांना अनेक हक्क-सवलती दिल्या आहेत. मात्र, या हक्कांचे काय होत असेल? याचा विचार करता पदरी निराशाच येते. गुन्हेगारी, नशा, महिला आणि बालकांचे लैंगिक शोषण, बेकायदेशीर कृत्यांमध्ये त्यांचा वापर या गोष्टी सर्रास घडतात. पोलीस प्रशासन आणि संबंधित लोक याबाबत आवाजही उठवतात. पण याबाबत संघटित स्तरावर आवाज आणि जागृती करण्यासाठी ‘एम पूर्व’ विभागातील स्वयंसेवी संस्था एकत्र आल्या आहेत. या सर्व संस्था ‘चाईल्ड सेफ्टी फोरम’ या नावांतर्गत एकत्र येऊन काम करत आहेत. यामध्ये ‘संकल्प’, ‘फॅमिली प्लानिंग असोसिएशन ऑफ इंडिया’, ‘युवा संस्था’, ‘खुला आसमान’, ‘डॉक्टर फॉर यू’, ‘मुंबई स्माईल फाऊंडेशन’, ‘जनजागृती विद्यार्थी संघ’, ‘जीवनधारा’, ‘बाल अधिकार संघर्ष संघटन’, ‘उम्मीद’ इ. सामाजिक संस्था व संघटनांचा समावेश आहे.

या फोरमला असे एकत्र येऊन काम करण्याची गरज वाटली. कारण, जागतिकीकरणाच्या रेट्यात बालकांच्या दैनंदिन आयुष्याची चौकटही अंतर्बाह्य बदलली आहे. बालकांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाबरोबरच त्यांच्या आरोग्याचे प्रश्नही गंभीर झाले आहेत. घराबाहेरचेही एक वेगळे जग आहे. त्या जगामध्ये बालकांचा सहभाग अनिवार्यपणे असतोच असतो. शाळा, खाजगी शिकवण्या, छंद शिकवण्या (हो! यासुद्धा शिकवण्या सध्या जोरात आहेत.) त्यानिमित्ताने बालकांचा होणार प्रवास. या सार्‍यांमुळे फुलासारख्या निष्पाप असणार्‍या बालकांच्या जीवनाला जाणणे-अजाणतेपणी वास्तवाचे काटे रूततच असतात. मानसिक, शारीरिक शोषण होण्याचा धोका पूर्वीपेक्षा जास्त वाढला आहे. या फोरमचे एक सदस्य म्हणून काम करताना बालकांचे अनेक प्रश्न नव्याने समजतात. ते असे, आजची बालके उद्याचे नागरिक असतात. त्यांचा भविष्यकाळ त्यांच्या आजच्या वर्तमानकाळावर अवलंबून आहे. आज त्यांच्याशी गैरवर्तन झाले किंवा त्यांच्यावर अत्याचार-अन्याय झाला तर त्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होतो. ती बालके एकतर कायमची न्यूनगंडामध्ये तरी जगतात किंवा त्यांच्यामध्ये अपराधाबाबतचे आकर्षण वाढते. ही गोष्ट टाळण्यासाठी बालकांच्या समस्यांवर उपाय योजणे गरजेचे असते. त्यामुळे ‘एम पूर्व’ प्रभागातील महिला आणि बालकांसाठी काम करणार्‍या संस्थांनी एकत्र येत बालकांच्या समस्यांवर काम करण्याचे ठरवले. नुसते बालकांचे प्रबोधन करून परिस्थिती सुधारणार नाही, तर त्या बालकांच्या पालकांचेही प्रबोधन व्हायलाच हवे, असे या फोरमला वाटते. त्यातूनच मग बालकांसोबतच पालक त्यातही महिलांसाठी काम करावे हा विचार पुढे आला.

आतापर्यंत फोरमच्या माध्यमातून कुपोषण, बाल संरक्षण समिती, फॅमिली प्लानिंग आणि आरोग्य याविषयी चर्चासत्र आयोजित करण्यात आले. तसेच बालकांच्या विविध समस्यांवर ठोस मदत मार्गदर्शनही करण्यात आले आहे. फोरमचे पुढचे नियोजन काय असेल, तर १० डिसेंबर रोजी ‘मानव अधिकार दिना’निमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रच्या १० जून, २०१४ च्या परिपत्रकानुसार ‘बाल संरक्षण समिती’ची स्थापना करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कुपोषण व आरोग्य, नशा, मुलांच्या संरक्षणाच्या उद्देशाने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.



 


फोरमच्या समन्वयकाची जबाबदारी युवा संस्थेचे प्रतिनिधी प्रकाश भवरे आणि विजय खरात यांच्यावर आहे
. ‘फॅमिली प्लानिंग असोसिएशन ऑफ इंडिया’च्या दीपाली बेलवणकर, ‘संकल्प’चे विनोद हिवाळे, ‘मुंबई स्माईल फाऊंडेशन’चे सचिन भगत आणि प्रसाद पांचाळ व ‘डॉक्टर फॉर यू’चे आश्रेंद्र कुमार यांच्यावर फोरमचे समन्वयक म्हणून जबाबदारी आहे.

-विनोद हिवाळे

@@AUTHORINFO_V1@@