काजोल साकारणार सावित्रीबाई मालुसरे!

    दिनांक  18-Nov-2019 15:37:16
|


'तानाजी : द अनसंग वॉरियर' या चित्रपटातील काजोलचा फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने काजोल आणि अजय देवगणची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात काजोल तानाजी मालुसरेंची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. रोमँटिक भूमिका साकारणारी काजोल पहिल्यांदाच एका ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे.


याआधी अजयने या चित्रपटातील इतर पात्रांचा लुक प्रेक्षकांसोबत शेअर केला होता.
'तानाजी : द अनसंग वॉरियर' या चित्रपटात तानाजी मालुसरेंची भूमिका स्वतः अजय देवगण साकारणार असून, अभिनेता शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. सैफ अली खान राजा उदयभान सिंग हे खलनायकी पात्रं साकारणार आहे. सेक्रेड गेममध्ये दिसलेला अभिनेता ल्युक केन्नी या चित्रपटात औरंगझेबाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे, तर अभिनेत्री पद्मावती राव वीरमाता जिजाऊ साकारणार आहेत. ओम राऊत दिग्दर्शित तान्हाजी : द अनसंग वॉरीअरहा चित्रपट येत्या वर्षी १० जानेवारीला प्रदर्शित होणार असून, हा चित्रपट थ्रीडीमध्ये असणार आहे.