मराठमोळे शरद बोबडे यांनी घेतली ४७वे सरन्यायाधीश पदाची शपथ

18 Nov 2019 10:31:22


 


नवी दिल्ली : न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या ४७वे सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी केंद्राला पत्र पाठवून शरद बोबडे यांचे नाव सुचवले होते. शरद बोबडे यांचा कार्यकाळ १७ महिने असणार आहे. २३ एप्रिल २०२१ मध्ये ते निवृत्त होत आहेत.

 

न्यायमूर्ती बोबडे यांनी देशातील अनेक महत्त्वाचे आणि ऐतिहासिक निर्णय दिले आहेत. अयोध्या प्रकरणाच्या घटनापीठातही शरद बोबडे यांचा समावेश होता. या प्रकरणातही त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. याआधी यशवंत विष्णू चंद्रचूड हे सरन्यायाधीश होणारे पहिले मराठमोळे व्यक्ती होते. ते सर्वाधिक काळ म्हणजेच ७ वर्ष ४ महिने सरन्यायाधीश पदावर कार्यरत होते.

 

न्यायमूर्ती बोबडेंचा जन्म २४ एप्रिल १९५६ रोजी नागपुरमध्ये झाला होता. त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. यानंतर २००० मध्ये मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली होती. २०१२ मध्ये मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांन पदभार सांभाळला होता. यानंतर २०१३ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात त्यांची नियुक्ती करण्यात आली.

Powered By Sangraha 9.0