आमिर 'लाल सिंग चढ्ढा' मध्ये कसा दिसेल त्याची झलक पहा

    दिनांक  18-Nov-2019 14:46:52
|


 

फॉरेस्ट गम्प' या हॉलिवूडमधील एका प्रचंड नावाजलेल्या चित्रपटाचे बॉलिवूड व्हर्जन 'लाल सिंग चढ्ढा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तत्पूर्वी आज या चित्रपटात खूपच महत्वाची भूमिका असलेल्या आमिर खानचे फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. शिखांचे प्रतीक असलेली शानदार पगडी घालून सरदारजीचा वेष, दाढी आणि चेहऱ्यावर एक उल्हासात्मक हास्य असे काहीसे रूप आमिर खानच्या या पोस्टरमधून झळकत आहे. त्याच्या या पोस्टरला प्रेक्षकांचा देखील चांगलाच प्रतिसाद दिसत असल्यामुळे सध्या आमिर सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे.

आमिर खानाने आज 'सत श्री अकाल जी' असे म्हणत आपले हे नवीन पोस्टर चाहत्यांसोबत शेअर केले. आमिर खान बरोबरच या चित्रपटात करीना कपूर खान आणि विजय सेथुपथी यांच्या देखील महत्वाच्या भूमिका चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे आमिर आणि करीना बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र काम करणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये त्याविषयी देखील उत्सुकता आहेच.

'लाल सिंग चढ्ढा' व्यतिरिक्त आगामी काळात करीना कपूर 'अंग्रेजी मिडीयम' आणि 'गुड न्यूज' या दोन चित्रपटांमध्ये देखील झळकणार आहे. दरम्यान अद्वैत चंदन दिग्दर्शित 'लाल सिंग चढ्ढा' हा चित्रपट पुढील वर्षी ख्रिसमसच्या दरम्यान प्रदर्शित होईल असे सांगण्यात येत असून नुकतीच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला देखील सुरुवात झाली आहे.