जम्मू काश्मीरमध्ये रेल्वेसेवा घेतेय वेग

    दिनांक  17-Nov-2019 18:50:49
|


जम्मू काश्मीरमध्ये रेल्वेसेवा घेतेय वेग
 

  

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० निष्प्रभ करण्यात आल्यानंतर अलिकडेच सुरू करण्यात आलेल्या रेल्वे सेवेला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे. रविवारी रेल्वे स्थानकात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. तसेच आठवडी बाजारातही खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या. काश्मीर खोऱ्यातील जनजीवन आता शांततेत आणि सुस्थितीत असल्याचे चित्र सध्या आहे.
 

श्रीनगर ते बनिहाल या दरम्यान रविवारी रेल्वेने दोन फेऱ्या पूर्ण केल्या. दक्षिण काश्मिरातील अनेक स्थानकांवर थांबून ही गाडी बनिहालला पोहोचते. या मार्गातील प्रत्येकच स्थानकांवर लोकांची गर्दी उसळली. शनिवारी या गाडीची चाचणी घेण्यात आल्यानंतर रविवारी ही सेवा सुरळीत सूरू झाली. सोमवारपासून गाडीच्या फेऱ्यांत वाढ करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
 

गेल्या सोमवारपासून सुरू करण्यात मिनी बस सेवेलाही आता चांगला प्रतिसाद आहे. काश्मिरातील रस्त्यांवर मिनी बसेस धावायला लागल्याने, अनेक खासगी वाहनचालकांनीही आपली वाहने रस्त्यावर उतरवली आहेत. यामुळे काही दिवसांपूर्वी सुनसान असलेले खोऱ्यातील रस्ते आता वाहनांच्या गर्दीने फुलले आहेत. आज रविवारच्या आठवडी बाजारालाही जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आवश्यक वस्तू, कपडे आणि इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी लोकांनी बाजारातील सर्वच दुकानांवर गर्दी केली होती.