चक्रीवादळाचा मत्स्यउत्पादनाला फटका

16 Nov 2019 11:51:54



मुंबई-
अरबी समुद्रात लागोपाठ निर्माण झालेल्या ‘क्यार’ आणि ‘महा’ चक्रीवादळामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कुलाबा, पालघर, डहाणू, वसई यांसारख्या भागात मासेमारी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याचा फटका मत्स्यउत्पादनाला बसला आहे.

माशांची आवक घटल्यामुळे किंमतीत तब्बल ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. माशांच्या पुरवठ्यात ६० ते ७० टक्क्यांनी घट झाल्याचे विकेत्यांनी सांगितले. कोकण किनारपट्टीवर साधारण ऑगस्टपासून मासेमारीचा हंगाम सुरु होतो आणि ऑक्टोबरनंतर माशांची आवक वाढायला सुरुवात होते. मात्र यंदा लागोपाठ दोनवेळा चक्रीवादळांचा तडाखा बसल्यामुळे, मत्स्यउत्पादनावर मोठा परिणाम झालेला दिसला. मत्स्यपुरवठ्यात घट झाल्याने माशांच्या किमतीही वाढल्या आहेत.


काय आहेत सद्याचे दर?

१५० रुपये किलोने मिळणारे बोंबील सध्या २०० रुपये किलोने मिळत आहेत, तर ४०० रुपये किलो दराने मिळणारी कोलंबी ५०० ते ६०० रुपये या दराने मिळत आहे. आकारमानानुसार ६०० ते १२०० रुपये किलोने मिळणारे पापलेट आता ८०० ते १५०० च्या दराने मिळत आहेत, तर ५०० रुपये किलोने मिळणाऱ्या सुरमईसाठी तब्बल ८०० रुपये किंमत मोजावी लागते आहे. या दरवाढीमुळे मत्स्यप्रेमींच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे.

Powered By Sangraha 9.0