मानुषी करणार या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण

    दिनांक  15-Nov-2019 13:27:00
|


 

मानुषी छिल्लर ही आत्तापर्यंत सर्वांना मिस वर्ल्ड म्हणून माहित असेलच. परंतु प्रेक्षकांच्या मनात आपली आणखी एक ओळख निर्माण करण्यासाठी ती आता सज्ज झाली आहे. मानुषी आता लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असलेल्या 'पृथ्वीराज' या चित्रपटामधून ती प्रेक्षकांसमोर येणार आहे. पृथ्वीराज हा चित्रपट एक ऐतिहासिक पट असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये याविषयी प्रचंड उत्सुकता आहेच मात्र आता मानुषी छिल्लरच्या चित्रपटातील भूमिकेविषयी देखील बरीच चर्चा आता रंगणार आहे हे नक्की.

यश राज फिल्म्स ची निर्मिती असलेल्या 'पृथ्वीराज' या चित्रपटासाठी विचारणा झाल्यामुळे मानुषीला खूपच आनंद झाला आणि तिने हा चित्रपट करण्याचे ठरवले अशा भावना तिने पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या. आत्तापर्यंत माझे आयुष्य एका परिकथेप्रमाणे गेले आहे, मग त्यामध्ये माझा मिस इंडिया ते माझा मिस वर्ल्ड पर्यंतचा प्रवास देखील. मात्र आता या चित्रपटात काम करायला मिळणे हा माझ्या आयुष्यातील एक नवीन भाग असेल असेही ती म्हणते.

अक्षय कुमार देखील सध्या बऱ्याच चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. बच्चन पांडे, गुड न्यूज आणि पृथ्वीराज असे चित्रपट येऊ घातले आहेत. त्यामुळे या सगळ्या चित्रपटांमधून तो प्रेक्षकांना कोणत्या वेगवेगळ्या अभिनयाच्या छटा दाखवतो हे पाहणे खूपच औत्सुक्याचे ठरेल.