कला क्षेत्रातील 'वंडर बी'

    दिनांक  14-Nov-2019 21:40:42   
|मधमाशी तिला लहानपणापासून आकर्षित करायची. तिच्याच प्रेरणेने तिने कंपनीच्या नावाची सुरुवात केली 'वंडर बी.' पण, नावात 'अ‍ॅड एजन्सी' वगैरे असा उल्लेख न करता तिला सर्जनशीलता लोकांना द्यायची होती. या संकल्पनेतून जन्मास आला 'वंडर बी क्रिएटिव्ह सोल्युशन्स' हा डिझायनिंग स्टुडिओ.


'अजिता' म्हणजे ज्यास कोणीही हरवू शकत नाही अशी व्यक्ती. तिला हे नाव अगदीच चपखल बसलंय. ज्याने कोणी तिचं नाव ठेवलंय, तिलासुद्धा कदाचित वाटलं नसेल की, ती नावाप्रमाणेच 'अजिता' राहणार आहे. नियतीने दिलेलं आयुष्याला एक अनपेक्षित वळण तिला हरवू शकलं नाही. तिने स्वत:चं मनोबल ढळू दिलं नाही, किंबहुना कितीही मध काढलं तरी आपलं मध तयार करण्याच्या कौशल्यावर प्रचंड विश्वास असणाऱ्या मधमाशीप्रमाणे ती आत्मविश्वासू बनली. मधमाशीच तिची प्रेरणा झाली आणि त्यातून साकारला क्रिएटिव्ह क्षेत्रातला एक आगळावेगळा कलात्मक डिझाईन स्टुडिओ 'वंडर बी क्रिएटिव्ह सोल्युशन्स'. ही प्रेरणादायी कथा आहे या डिझायनिंग स्टुडिओच्या संचालिका अजिता महाजन यांचीजगन्नाथ आणि स्नेहलता या महाजन दाम्पत्याच्या पोटी अजिताचा जन्म झाला. अजिताचे वडील जगन्नाथ महाजन हे सचिवालयात लेखापरीक्षक पदावर कार्यरत होते, तर अजिताची आई स्नेहलता या मुंबई महानगरपालिकेत अधिकारी होत्या. खरंतर या दाम्पत्याच्या आयुष्याचा एक वेगळाच किस्सा आहे.

 

जगन्नाथ महाजन यांची नोकरी गेल्यानंतर तब्बल पाच वर्षे ते 'कधी एखादा व्यवसाय कर' तर 'कधी एखादी छोटी नोकरी कर' असं अंधारात करिअर चाचपडत होते. कधीच ट्रेन न पाहिलेल्या स्नेहलता महानगरपालिकेच्या नोकरीसाठी कल्याण ते व्हीटी (आताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) असा प्रवास करू लागल्या होत्या. दरम्यान, अजिताचा लहान भाऊ अभिजीतचा जन्म झाला. अंधारात करिअर चाचपडणाऱ्या जगन्नाथ महाजनांना सचिवालयात लिपिक पदाची नोकरी गवसली. महाजन कुटुंबाला एक स्थैर्य लाभलं. कल्याणहून डोंबिवलीला महाजन कुटुंब स्थिरावलं. अजिताचं शालेय शिक्षण एस. एच. जोंधळे विद्यालयातून झालं. अकरावी, बारावी विज्ञान शाखेतून नेरुरकर हायस्कूलमधून पूर्ण केले. अजिताने डॉक्टर व्हावं, असं सगळ्यांना वाटायचं. तिला मात्र कलेची आवड होती. बारावी झाल्यावर तिने करंदीकर अकॅडमीमधून एका वर्षाचा फाऊंडेशन कोर्स केला. त्यानंतर मुंबईच्या सोफिया महाविद्यालयातून 'अप्लाईड आर्ट' या विषयातून पदवी मिळवली. त्यानंतर तिने दोन वर्षे कॉपीरायटिंग एजन्सी, प्रिंटिंग हाऊस आणि जाहिरात कंपन्यांमधून काम केले. सगळंच आलबेल चाललंय, असं वाटत असताना एक अनपेक्षित घडलं.

 

रेषांचे स्ट्रोक्स काढणारा उजवा हात संधीवाताच्या स्ट्रोकमुळे थांबला. ट्रेकिंगसाठी डोंगरदऱ्या पालथ्या घालणारी, फोटोग्राफी करण्यासाठी नद्या-नाले पायी तुडवणारी अजिता शांत झाली. उपचार सुरू होते. तिच्याजागी कोणी दुसरं असतं तर कदाचित पुन्हा उभी राहिली असती की नाही शंका आहे. मात्र, नावातच 'हार' नसलेली 'अजिता' नावाला जागली. ऐन उमेदीची ती नऊ वर्षे तिने स्वत:ला शोधण्यात आणि घडवण्यात घालवली. तो काळ आपल्या आयुष्याचा सर्वोत्तम काळ होता असं ती मानते. पुस्तकवेड्या अजिताने स्वत:ची लायब्ररी तयार केली. संस्कारकेंद्रात मुलांना चित्रकला शिकवायला लागली. रॉकेटला लागलेली आग आपल्याला दिसते. पण, ते एकदा आकाशात झेपावलं की गगनभरारी घेतं. अजिताने स्वत:चं आयुष्य असंच प्रज्वलित करून घेतलं. तिच्या या संघर्षाच्या काळात तिच्या आई-बाबा अन् मावशीने प्रचंड साथ दिली. सोबत नेहमी 'टॉम अ‍ॅण्ड जेरी' सारखं नातं असणारा छोटा भाऊ अभिजीत कधी मोठा भाऊ बनून जबाबदारीने वागायला लागला कळलंच नाही. अजिताने मग जिद्द सोडलीच नाही. औरंगाबादमध्ये ती जाहिरात कंपनीत नोकरी करू लागली. सोबतीला फ्रीलान्सिंग करू लागली. इतकंच काय पण तिने जरदोसी काम शिकून कृष्ण मंदिरातील कृष्णासाठी कितीतरी मुकुटदेखील तयार केले. २०१३ साली ती पुन्हा डोंबिवलीला आली, अगदी नव्या जोमाने आणि तंदुरुस्त होऊन. एका जाहिरात कंपनीत ती 'सिनिअर व्हिज्युअलायझर' म्हणून काम करू लागली. याचदरम्यान विविध विषय शिकण्याची तिची भूक वाढली. ती अ‍ॅडव्हान्स फोटोग्राफी शिकली. सोबतच इलस्ट्रेशन, कॅरॅक्टर डिझाईन, डिजिटल कॅलिग्राफी शिकली. यासाठी काही वर्षे तिने आपले विकेण्ड स्वाहा केले.

 

जगासाठी काहीतरी कलात्मक-सर्जनशील करावं, स्वत:ला व्यक्त करता यावं असं काहीसं तिचं स्वप्नं होतं. औरंगाबादमध्ये असतानासुद्धा आपल्या रोजनिशीमध्ये ती दररोज आपल्या या स्वप्नाविषयी लिहायची. याचदरम्यान, दादरच्या एका अकॅडमीमध्ये तिने कलाशिक्षिका म्हणून नोकरी केली. या अनुभवाने ती समृद्ध झाली. आता हीच ती वेळ स्वत:चं काहीतरी करायचं, या जाणिवेने ती झपाटली. मधमाशी तिला लहानपणापासून आकर्षित करायची. तिच्याच प्रेरणेने तिने कंपनीच्या नावाची सुरुवात केली 'वंडर बी.' पण, नावात 'अ‍ॅड एजन्सी' वगैरे असा उल्लेख न करता तिला सर्जनशीलता लोकांना द्यायची होती. या संकल्पनेतून जन्मास आला 'वंडर बी क्रिएटिव्ह सोल्युशन्स' हा डिझायनिंग स्टुडिओ. सात ते आठ कलाकार या संस्थेशी संलग्न आहेत. कॉर्पोरेट्स, इस्पितळे, अन्न व प्रक्रिया करणाऱ्या कंपन्या, पॅकेजिंग अशा विविध क्षेत्रांतील संस्थांसाठी 'वंडर बी क्रिएटिव्ह सोल्युशन्स'चे काम करते. या क्षेत्रात ज्यांना संधी मिळत नाही, अशा गुणी कलाकारांसाठी लवकरच कार्यशाळा घेण्याचा अजिताचा मानस आहे. "स्वत:ची आवड जपा. पॅशन फॉलो करा. वाचन, मनन करा, कलाकाराला सुंदर गोष्टी अनुभवता आल्या पाहिजेत. विचार शुद्ध असले पाहिजेत. जग वाईट नसतं. सकारात्मक पाहायला शिकलं पाहिजे आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे राखेतून उभं राहता आलं पाहिजे," अजिता महाजन यांचा कानमंत्र हा कोणालाही यशाच्या मार्गाकडे नेईल, हे निश्चित. अजिता ही खऱ्या अर्थाने कला क्षेत्रातील 'वंडर बी' आहे.