‘मार्वल’कडून जनक स्टॅन लींना अनोखी श्रद्धांजली!

    दिनांक  13-Nov-2019 13:20:44
|

 

कॉमिक्स जगताचे महानायक, मार्वल कॉमिक्सचे माजी संपादक आणि स्पायडर मॅन व हल्क यांसारख्या अनेक सुपरहिरोंचे जन्मदाते स्टॅन ली यांचा आज प्रथम स्मृतिदिन. या निमित्ताने मार्वलच्या अधिकृत ट्विटर पेजवरून एक सुंदर चित्र पोस्ट करून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या चित्रात स्टॅन लींसह त्यांची निर्मिती असलेल्या सगळ्या सुपरहिरोंची पात्र त्यांच्या खांद्यांवर बागडताना दिसत आहेत.
 
 

 

कॉमिक्सचे लेखक, संपादक, चित्रपट निर्माता, अभिनेता आणि प्रकाशक अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी असलेले स्टॅन ली हे मार्वल कॉमिक्सचे बलस्थान होते. ली संपादक झाल्यानंतर मार्वलने कॉमिक्सच्या दुनियेत भरारी घेतली. १९६१ मध्ये 'द फॅन्टास्टिक फोर' हे सुपर हिरो असलेले कुटुंब ली यांनी वाचकांच्या हाती दिले. त्याला अफाट प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ली यांनी अनेक सुपरहिरोंना आपल्या लेखणीतून जन्म दिला. वास्तवात सुपरहिरोचा वावर कसा असेल, हे ध्यानात ठेऊन ली यांनी पात्रं उभी केली. त्यातूनच स्पायडर मॅन, हल्क, एक्स मॅन, आयरन मॅन, ब्लॅक पँथर, कॅप्टन अमेरिका, अँट मॅन हे सुपरहिरो अवघ्या जगाला मिळाले. पनिशर, डेअरडेव्हिल हे अँटी सुपरहिरोही ली यांनी उभे केले.
 

बदलत्या काळानुरूप ली यांचे सुपरहिरो चंदेरी दुनियेत दाखल झाले आणि या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. मार्वलनेच या सगळ्या सुपरहिरोंना मोठ्या पडद्यावर आणले. या सगळ्याच चित्रपटांत ली यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. 'चक्र' या सुपरहिरो फिल्मच्या निमित्ताने ली यांनी भारतातही चित्रपट निर्मितीचे काम केले. चक्र हा अॅनिमेशनपट होता. कार्टून नेटवर्क, ग्राफिक इंडिया म्हणजेच पाओ इंटरनॅशनलने संयुक्तपणे तो साकारला होता.