या हॉलीवूड अभिनेत्रीला पहायचाय सलमानचा चित्रपट!

    दिनांक  13-Nov-2019 15:18:01
|

अमेरिकन पॉपस्टार केटी पेरी सध्या एका म्युझिक कॉन्सर्टसाठी भारत दौऱ्यावर आहे. मुंबईमध्ये होणाऱ्या एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये ती परफॉर्म करणार आहे. काल रात्री झालेल्या एका कार्यक्रमात केटीची भेट अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीससोबत झाली. जॅकलीनने आपण केटीची फॅन आहोत असं म्हणत या भेटीचा व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये ‘मी आज रात्री किक चित्रपट पाहणार आहे’, असं केटी जॅकलीनला बोलताना दिसत आहे.

 
 


२०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘किक’ चित्रपटात जॅकलीन सलमान खानसह मुख्य भूमिकेत झळकली होती. याव्यतिरिक्त या चित्रपटात रणदीप हुडा, नावाजुद्दिन सिद्धिकी, मिथुन चक्रवर्ती, सौरभ शुक्ला, सुमोना चक्रवर्ती यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

 

मुंबईमध्ये होणाऱ्या या म्युझिक कॉन्सर्टमध्ये केटी पेरी, पॉपसिंगर दुआ लिपासह परफॉर्म करणार आहे. या म्युझिक कॉन्सर्टमध्ये भारतीय गायक आणि गीतकार अमित त्रिवेदीही परफॉर्म करताना दिसणार आहे. केटीच्या या पहिल्याच भारतदौऱ्यात अनेक भारतीय अभिनेते आणि अभिनेत्रींची ती भेट घेणार आहे. केटीसाठी करण जोहरनं पार्टी आयोजित केली असून, या पार्टीला रणवीर सिंग, दीपिका पदुकोन, आलिया भट्ट, वरूण धवन हजेरी लावणार आहेत.