छोडेन लेपचा भविष्यात मोठ्या समाजसुधारक बनतील!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2019
Total Views |



राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे गौरवोद्गार



मुंबई : "आपल्या ग्रामीण साहित्यातून समाजपरिवर्तन घडविणार्‍या छोडेन लेपचा भविष्यात मोठ्या समाजसुधारक, कादंबरीकार बनतील आणि त्यांनी दाखविलेल्या रस्त्यानेच वाटचाल करत लेपचा समाज त्यांचा सदैव ऋणी राहील," असा विश्वास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बुधवारी व्यक्त केला.

 

'माय होम इंडिया'तर्फे छोडेन लेपचा यांना राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते वन इंडिया पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावेळी त्यांनी छोडेन लेपचा यांना भरभरून आशीर्वाद दिले. दादर येथील स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सभागृहात बुधवारी दि. १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, वाराणसी येथील सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू डॉ. अंजिला गुप्ता, भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि 'माय होम इंडिया'चे संस्थापक सुनील देवधर, पूर्णार्थ इन्व्हेस्टमेंटचे राहुल राठी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले की, "सुनील देवधर यांचे कार्य फार प्रशंसनीय आहे. उत्तर-पूर्व भारतातील दुर्गम भागातील समाजासाठी त्यागी वृत्तीने जगणार्‍या लोकांचा शोध घेऊन त्यांना अधिक प्रोत्साहित करणे सोपे नाही. भारतात समग्रता आहे, मात्र, समग्रतेच्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न कमी केला जातो. उत्तर-पूर्व भारताचे सौंदर्य विलोभनीय असले तरी तेथील लोकांचे जीवन खडतर आहे. तरीही तेथे राष्ट्रभक्तीचे दीप प्रज्वलित होत असतात. सिक्कीम, नाथोले, गुरुडुम्बा येथील लोकांची परिस्थिती फार केविलवाणी आहे. दारूच्या व्यसनी गेलेले लोक, शेती सावकाराकडे गहाण ठेवलेली, अशा लोकांना आपल्या लेखणीच्या मार्गाने एकत्र आणून, त्यांना व्यसनमुक्त करून शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची ज्योत तेवत ठेवत समाजपरिवर्तन घडविणे सोपे काम नाही. मात्र, छोडेन लेपचाने ते त्यागी वृत्तीने पार पाडले आहे," अशा शब्दांत राज्यपालांनी छोडेन लेपचाच्या कार्याचा गौरव केला.

 

उत्सवमूर्ती छोडेन लेपचा म्हणाल्या की, "खडतर बालपण गेलेल्या त्यांना समाजसेवेची प्रेरणा मिळाली, ही ईश्वराची कृपाच म्हटली पाहिजे. अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाशी संलग्न असल्याने कामात अधिक गती आली. सिक्कीमचा ग्रामीण भाग सोडून कधीच बाहेर पडले नव्हते. मुंबईविषयी टीव्हीवर पाहिले होते. वर्तमानपत्रात वाचले होते. मात्र, या पुरस्काराच्या निमित्ताने प्रथमच विमानातून मुंबईत आले. पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण घेतले. जुहूच्या श्रीकृष्ण मंदिरात जाताना अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याजवळून गेले. स्वप्नातल्या मुंबईचे प्रथमच सत्यदर्शन घडले. मुंबई सुंदर आहे. येथील लोकही चांगले आहेत. या लोकांच्या आशीर्वादामुळे सामाजिक कामाचे बळ मिळेल आणि ते अधिक चांगल्या पद्धतीने होईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देश, राज्य, जनजाती आणि आई-वडिलांना पुरस्कार अर्पण करून त्यांनी आयोजकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

 

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, गौतम ठाकूर, डॉ. अंजिला गुप्ता, सुनील देवधर, राहुल राठी यांनीही आपले विचार व्यक्त करत लेपचा यांच्या कार्याचा गौरव केला आणि सहकार्याचा हातही पुढे केला. वन इंडिया पुरस्कार म्हणजे 'अवर-नॉर्थ-ईस्ट इंडिया' पुरस्कार. उत्तर-पूर्व भारतातील आठ राज्यांतील सामाजिक, सांस्कृतिक कार्याची ओळख या पुरस्काराच्या माध्यमातून दिली जाते. इतर राज्यांनीही त्यापासून बोध घ्यावा, हा या पुरस्कारामागचा हेतू आहे. मुंबईत तो 'वन इंडिया' नावाने दिला जातो, तर मुंबईबाहेर कर्मयोगी नावाने दिला जातो.

@@AUTHORINFO_V1@@