२२२ कोटींचे घड्याळ!

13 Nov 2019 21:33:07





'स्टेट्स'चा विचार केला तर 'रोलेक्स' ही कंपनी जगातील एकमेव घड्याळ कंपनी, जिच्या नावे सर्वाधिक किमतीचे घड्याळ विकण्याचा विक्रम आहे. एकेकाळी १२७ कोटींचे 'डेटोना रोलेक्स' नामक रिस्ट वॉच बनविण्याचा विक्रम होता. मात्र, हा विक्रम एका लिलावामुळे मोडीत निघाला आहे.


'मनगटावरची शान' म्हणून ओळखल्या जाणार्‍या घड्याळाला पेहेरावात महत्त्व तसे विशेषच. घड्याळाचा ब्रॅण्ड कोणता? त्याची किंमत किती? यावरूनही व्यक्तिमत्त्वाची चर्चा केली जाते. पुरुषांसाठी हा एकमेव दागिना असल्याने घड्याळाचे आकर्षण तसे पुरुषांमध्येही दिसतेच. वेळेच्या तालावर नाचणारा मनुष्य वेळेला महत्त्व देईल की नाही, हेही सांगता येत नाही. मात्र, घड्याळांना महत्त्व देण्याची परंपरा कित्येक शतकांपासूनची आहे. बदलत्या काळानुसार, स्मार्टवॉच, फिटनेस बँड आणि अन्य गॅझेट्सचा पगडा पडत गेला. मात्र, बदलत्या काळातही मनगटावरील घड्याळांची क्रेझ कायम आहे.

 

'स्टेट्स'चा विचार केला तर 'रोलेक्स' ही कंपनी जगातील एकमेव घड्याळ कंपनी, जिच्या नावे सर्वाधिक किमतीचे घड्याळ विकण्याचा विक्रम आहे. एकेकाळी १२७ कोटींचे 'डेटोना रोलेक्स' नामक रिस्ट वॉच बनविण्याचा विक्रम होता. मात्र, हा विक्रम एका लिलावामुळे मोडीत निघाला आहे. 'रोलेक्स'कडून हा किताब 'पाटेक फिलीप' कंपनीला मिळणार आहे. 'ग्रॅण्डमास्टर चिम ६३०० ए-०१०' या घड्याळाची तब्बल २२२ कोटींना बोली लागली आहे. 'ओन्ली वॉच' या नावाने या घडाळ्याचा लिलाव करण्यात आला होता.

 

स्वित्झर्लंडस्थित असलेल्या घड्याळ कंपनीने जिनिव्हा येथे जगातील सर्वात महागड्या घड्याळाची बोली लावली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे घड्याळ इतक्या भरमसाट किमतीला विकले जाईल, असा या कंपनीला किंचितही अंदाज आला नव्हता. त्यामुळे ही बाब कंपनीसाठीही तितकीच आश्चर्यकारक ठरली आहे.

 

'पाटेक फिलीप' या कंपनीची स्थापना १८३९ साली झाली. जिनिव्हा येथे या कंपनीचे मुख्यालय आहे. जगभरात एकूण चारशे दालने आणि बारा वितरण केंद्र अधिक केंद्र आहेत. जगभरातील प्रतिष्ठित मानल्या जाणारी या कंपनीची घड्याळे आजवर राणी व्हिक्टोरिया, राणी एलिझाबेथ दुसरी, पोप पायस नववे, मेरी क्युरी, अल्बर्ट आइन्स्टाइन, जॉन एफ. केनेडी, नेल्सन मंडेला, पाब्लो पिकासो, लिओ टॉलस्टॉय आदी व्यक्तिमत्त्वांची नावे या ब्रॅण्डशी जोडली आहेत. जगातील दहा सर्वश्रेष्ठ घड्याळांच्या लिलावात सात घड्याळे ही आमच्या कंपनीचीच असतात, असा कंपनीचा विश्वास आहे.

 

रिस्ट वॉचसाठी मोजण्यात आलेली सर्वात मोठी रक्कम या बोलीमध्ये लावण्यात आली आहे. खास लिलाव पद्धतीत विकण्यात आलेल्या या घड्याळावर बोली लावण्यासाठी जगभरातील धनाढ्यांनी हजेरी लावली होती आणि अवघ्या पाच मिनिटांतच हे घड्याळ विकले गेले. हा एक जगातील विक्रम बनला. यापूर्वी हा किताब रोलेक्सच्या नावे होता. २०१७ मध्ये 'डेटोना रोलेक्स' हे रिस्ट वॉच १७.८ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच १२७ कोटी इतक्या किमतीला विकले गेले होते.

 

जिनिव्हा येथे २२२ कोटींना विकल्या गेलेल्या या घड्याळाची वैशिष्ट्येही तितकीच अनोखी ठरली. यामुळेच घड्याळाला इतक्या कोटींची बोली लागली. या एका घड्याळात एकूण २० प्रकारची वैशिष्ट्ये आहेत. यात रिंगटोन, फोर डिजिट इअर डिस्प्ले, मिनिट रिपिटर, फ्रंट आणि बॅक डायल, फ्लिप रिव्हर्स मोडही आहे. अशा अद्यावत फिचर्सच्या या घड्याळाने या विक्रमासह कंपनीचेही नाव कोरले आहे. हा विक्रम प्रस्थापित करणार्‍या घड्याळाच्या मालकाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, कंपनीतर्फे हा सारा खटाटोप करण्यामागचा हेतू आणि कारणही तितकेच उदात्त असल्याने यावर फारशी टीकाटिपण्णी झाली नाही. कंपनी या घड्याळाच्या किमतीतून आलेली रक्कम करवजावट करून एका सामाजिक संस्थेला देण्यात आली. त्यामुळे एकप्रकारे या उपक्रमाचे कौतुकच झाले.

 

अशाप्रकारे आपला ब्रॅण्ड जगासमोर आणणे आणि सामाजिक उपक्रमातून जागतिक विक्रम करत प्रस्थापित ब्रॅण्डचा विक्रम मोडीत काढणे, याचे विपणन कौशल्य साधून कंपनीने जगाच्या नजरा स्वतःकडे वळवून घेतल्या. मुळात इतक्या मोठ्या कंपनीला स्वतःच्या वेगळ्या ब्रॅण्डिंगची गरजच नसावी. मात्र, या एका उपक्रमामुळे रोलेक्सचा विक्रम मोडत एक व्यवसाय रणनीतीही कंपनीने मांडली. कंपनीकडे असलेल्या कलेक्शनपैकी इतर घड्याळांच्या तुलनेत सामान्य दिसणार्‍या घड्याळाने मात्र आपला वेगळा ठसा उमटवला, हे अजबच !
Powered By Sangraha 9.0