क्रिती सॅनोनबरोबर स्क्रीन शेअर करणार ही मराठी अभिनेत्री!

    दिनांक  12-Nov-2019 17:39:57
|


 

 ‘हाउसफुल ४’च्या यशानंतर नुकतंच क्रिती सॅनोननं तिच्या आगामी चित्रपट ‘मिमी’च्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. ही आतापर्यंतची सगळ्यात सुंदर स्क्रिप्ट असल्याचं क्रितीनं म्हटलं आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज चित्रपटाच्या एका पोस्टरचं सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनावरण केलं. या पोस्टरमध्ये क्रितीसोबत एका मराठी अभिनेत्रीचा चेहेराही प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या चित्रपटात क्रितीसोबत मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर दिसणार आहे.
 
 

लक्ष्मण उतेकर या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून, यात अभिनेता पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. २०१० मध्ये आलेल्या ‘मला आई व्हायचंय’ या मराठी चित्रपटाच्या कथेवर आधारित हा चित्रपट असणार आहे. या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवण्यात आलेलं. सरोगेसी आणि त्यानंतरच्या जबाबदाऱ्या यावर भाष्य करणारी ही कथा लवकरच आपल्याला हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.

 

सई ताम्हणकरनं याआधी ‘हंटर’, ‘गजनी’ सारख्या हिंदी चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत. ‘मिमी’ व्यतिरिक्त सई सध्या ‘पाँडिचेरी’ या मराठी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सईसह वैभव तत्त्ववादी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर आणि नीना कुलकर्णी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर क्रिती सध्या ‘पानिपत’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात क्रितीसह अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत दिसणार असून, क्रिती ‘पार्वतीबाईं’ची भूमिका साकारणार आहे.