ही अभिनेत्री म्हणतेय ‘टिकटॉक, नको रे बाबा!’

    दिनांक  12-Nov-2019 18:09:12
| 

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'बाला' या चित्रपटामध्ये आयुष्मान खुरानासह, अभिनेत्री यामी गौतम मुख्य भूमिकेत दिसली. या चित्रपटात यामी टिकटॉक सुपरस्टार’च्या भूमिकेत दिसली आहे. यामीच्या या भूमिकेवरून ती टिकटॉकचा कायम वापर करत असावी, असं तिच्या चाहत्यांना नक्की वाटेल. परंतु प्रत्यक्ष आयुष्यात यामीला टिकटॉक वापरता येत नाही. मात्र चित्रपटाच्या प्रमोशनसाठी यामीने टिकटॉकसोबत कोलॅबोरेट करून अनेक टिकटॉकर्ससोबत व्हिडीओ चित्रित केले आहेत.
 

याविषयी सांगता यामी म्हणते, 'चित्रपटात माझी भूमिका एका टिकटॉक सुपरस्टारची आहे. ती दिवसभर टिकटॉक व्हिडिओ बनवत असते. खऱ्या आयुष्यात मात्र मला टिकटॉकमधला 'ट'देखील माहीत नाही. मला ते वापरताही येत नाही. मी इथे पहिल्यांदा अकाउंट उघडले, तेव्हा थक्क झाले होते. ते एक वेगळंच जग आहे. एक धमाल विश्व आहे. इथले लोक व्हिडिओ मात्र अगदी गांभीर्यानं आणि व्यावसायिक पद्धतीनं बनवतात. दहा सेकंदाच्या व्हिडिओमध्ये ते आपली सर्जनशीलता दाखवितात. शूटिंगसाठी हे सारं पाहणं आवश्यक होतं. अनुभवासाठी काही व्हिडिओही तयार करायचे होते. ते मी केले; परंतु ते मी माझ्या अकाउंटवरून अजून पोस्ट केलेले नाहीत. शूटिंग संपल्यावर मी ते अकाउंट पुन्हा पाहिलेलंही नाही.' तेव्हा ‘टिकटॉक, नकोच रे बाबा!’