अधिकार्‍यांच्या खिशाला बक्षिसांचा ‘खड्डा’

    दिनांक  01-Nov-2019 19:38:24
|
मुंबई : शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी ‘खड्डे दाखवा आणि ५०० रुपये मिळवाअशी नवी योजना महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी जाहीर केली असली तरी बक्षिसाची रक्कम महापालिकेच्या तिजोरीतून नव्हे, तर संबंधित विभाग अधिकारी आणि त्या त्या विभागाच्या रस्ते विभागाशी संबंधित अधिकार्‍यांच्या खिशातून जाणार आहेत. त्यामुळे खड्डा न बुजल्यास अधिकार्‍यांच्याच खिशाला खड्डा पडणार आहे.


आयुक्तांच्या ५०० रुपये बक्षिसाच्या नव्या योजनेविषयी स्थायी समितीत शुक्रवारी जोरदार टीका झाली
. त्यावेळी उपस्थित अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी सांगितले की, खड्डे भरण्यात दिरंगाई करणार्‍या अधिकार्‍यांना धडा मिळावा, त्यांच्याकडून तातडीने खड्डे बुजवण्याचे काम व्हावे म्हणून ही योजना जाहीर करावी लागली. खड्डे दाखवणार्‍या नागरिकांना पालिकेच्या तिजोरीतून नव्हे, तर विभाग अधिकारी किंवा संबंधित इतर अधिकार्‍यांच्या खिशातून बक्षिसाची रक्कम देण्यात येईल.


तत्पूर्वी
, ‘खड्डे दाखवा आणि ५०० रुपये मिळवाया योजनेविषयी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करताच सभागृहात तीव्र पडसाद उमटले. महापौरांना किंवा स्थायी समितीला विश्वासात न घेता जाहीर केलेल्या या याजनेच्या बक्षिसाची रक्कम पालिकेच्या तिजोरीतून खर्च न करता आयुक्तांनी स्वतःच्या खिशातून द्यावी अशी मागणीही सभासदांनी केली. राखी जाधव, असिफ झकेरिया, किशोरी पेडणेकर, जावेद जुनेजा, रमेश कोरगावकर यांनीही या चर्चेत भाग घेतला.