महाराष्ट्राचा सुपूत्र बनला लडाखचा पहिला पोलीस अधिकारी

    दिनांक  01-Nov-2019 15:57:04
|


 
 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू काश्मीरचे कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीर व लडाखचे असे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले आहेत. दोन्ही प्रदेशांना ३१ ऑक्टोबरपासून केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. लडाखच्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे देण्यात आली आहे. लडाखच्या पोलीस प्रमुखपदी मराठमोळ्या सतीश खंदारे यांची नियुक्ती झाली आहे. सतीश खंदारे हे अमरावतीच्या धामणगावचे सूपुत्र लडाखचे पहिले पोलीस प्रमुख ठरले आहेत.

खंदारे यांचे प्राथमिक शिक्षण अमरावतीमधील धामणगाव तालुक्यातील जळका पटाचे येथील अशोक विद्यालयात झाले. १९८६ मध्ये त्यांनी दहावीची परिक्षा दिली. त्यात त्यांनी ८६ टक्के गुण मिळवले. त्यानंतर धामणगावांतील सेफला हायस्कूलमधून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. पुण्यातील सीओयुपी अभियांत्रिकी महाविद्यालयातून ते १९९२ मध्ये त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. १९९५ मध्ये ते आयपीएस अधिकारी बनले. सतिश खंदारे हे जम्मू काश्मीर कॅडरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी श्रीनगर परिसरात वेगवेगळ्या जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदाचा कार्यभार सांभाळला.