तोपर्यंत मला मुख्यमंत्री करा !

    दिनांक  01-Nov-2019 10:51:00
|मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरून सत्तास्थापनेचा तिढा सुटता सुटेनासा झाला आहे. मात्र, अशातच एका शेतकऱ्याने तूर्त मला मुख्यमंत्री करा, अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे. बीड जिल्ह्यात राहणारे श्रीकांत विष्णू गदळे यांनी मला मुख्यमंत्री करा, असे निवेदन राज्यपालांना दिले आहे. केज तालुक्यातील दहिफळ गावात राहणारे गदळे गेल्या १० ते १२ वर्षांपासून समाजकारणात आहेत.

 

सध्या अवकाळी पाऊस आणि ओला दुष्काळ यामुळे पिकांच्या नुकसानाबद्दल तातडीने निर्णय घेणे गरजेचे असून सत्तास्थापनेमुळे शेतकऱ्यांना मदत मिळणे मुश्कील झाले आहे. महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्ती लक्षात घेता सर्वसामान्य शेतकरी हवालदिल झाला आहे. याबद्दल तातडीने उपाययोजना होणे गरजेचे असून राज्यपालांनी जनहितार्थ हा निर्णय घ्यावा, अशी मागणी गदळे यांनी केली आहे.

 

याबद्दलचे निवेदन बीडचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असून याची प्रत राज्यपालांकडे रवाना करावी, अशी मागणी ३१ ऑक्टोबर रोजी लिहीलेल्या पत्रात केली आहे. याची तत्काळ दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करू, असा इशाराही गदळे यांनी दिला आहे.