‘मूर्तामूर्त’ अनिल नाईक

    दिनांक  01-Nov-2019 22:03:00
|
अनिल नाईक यांची कलाजगतात विशिष्ट ओळख आहे. ते सर जे. जे. स्कूलमध्ये विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले. जहांगिर कलादालनाच्या व्यवस्थापन समितीवरही ते सदस्य आहेत. ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’चे अध्यक्षपदही त्यांनी डोळसपणे सांभाळले आहे. ‘एनजीएमए’च्या सल्लागार मंडळावरही ते सदस्य आहेत.


चित्रकार अनिल नाईक. ‘सिर्फ नाम ही काफी हैं।’ हे वाक्य त्यांच्यासाठी किंवा त्यांची ओळख सांगण्यासाठी पुरेसे आहे. माझा त्यांचा परिचय ‘जेजे’च्या नावाशी जोडलेला आहे. कधीतरी त्यांची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी, तर कधी मी प्रदर्शन अधिकारी असताना पेन्टिंग्जचे परीक्षक म्हणून त्यांना बोलाविल्यानंतर होणार्‍या कलासंवादाद्वारे कधी कधी आम्ही शिक्षकांचे दीर्घ प्रश्न सोडविण्यासाठी सर्वजण एकत्र यायचो. पुढाकार जरी माझा असला तरी एक विचार आणि अनुमोदन चित्रकार आणि प्राध्यापक अनिल नाईक यांचे असायचेच, एकूणच या आठवणी निघण्याचं कारणही तसंच आहे.कलाकारांच्या पंढरीत जहांगिर कला दालनात त्यांचा सुमारे दोन
-अडीच तासांचा कलाप्रवास व्यक्त होत आहे. प्रदर्शनाच्या रूपाने प्रत्येक महान किंवा प्रसिद्ध व्यक्तींची एक असते. अनिल नाईक यांची कलाजगतात विशिष्ट ओळख आहे. ते सर जे. जे. स्कूलमध्ये विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले. जहांगिर कलादालनाच्या व्यवस्थापन समितीवरही ते सदस्य आहेत. ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’चे अध्यक्षपदही त्यांनी डोळसपणे सांभाळले आहे. ‘एनजीएमए’च्या सल्लागार मंडळावरही ते सदस्य आहेत. कलेतील व्यवस्थापन कसे हाताळावे, याचा समृद्ध अनुभव त्यांच्या शिदोरीत आहे. हे सांगण्यासाठी ही अनुभव गाथा पुरेशी आहे.५ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर या सप्ताहात त्यांच्या कलाप्रवासाची कहाणी आपल्याला जहांगिरमध्ये पाहायला मिळणार आहे
. जेव्हा विज्ञान संपते, तेव्हा अध्यात्म सुरू होते, असे आध्यात्मिक अभ्यासकांमध्ये बोलले जाते. अगदी तसेच कलाक्षेत्रातील चित्रकलेच्या बाबतीत बोलले जाते. चित्रकार अनिल नाईक यांच्या या कलाप्रदर्शनाद्वारे मांडण्यात आलेला कलाप्रवास हा मूर्ताकडून अमूर्ताकडे आहे. मूर्त शैलीतील कलाकृती या संवाद साधतात. मात्र, त्या संवादाला बर्‍याचदा मर्यादा पडतात. पण, अमूर्त शैलीतील कलाकृती या संवादाच्याही पलीकडे जाणार्‍या असतात. क्षितिज आणि प्रतल ज्याप्रमाणे थांग वा ठाव न लागणारे असते, तसेच अमूर्त शैलीतील कलाकृतींच्या बाबतीत सांगता येते. आपण त्या दृष्टिकोनातून त्या कलाकृतीकडे पाहतो-बघतो. त्यानुसारच ती अमूर्त कलाकृती आपल्याशी संवाद साधते. अशा कलाकृती त्या आत्मसंवादी असतात आणि जर ज्येष्ठ अनुभवी कलाकारांच्या कुंचल्यातून अशी कलाकृती निर्माण झाली तर तिचा संवाद हा एका आध्यात्मिक स्थितीला घेऊन जातो.चित्रकार अनिल नाईक यांचा जलरंग लेपनातील अनुभव हा अत्युच्च सौंदर्याभिरुचीचा दृष्टांत ठरतो
. या प्रदर्शनातील चित्रमालिका पाहताना हे अनुभवण्याची संधी कलारसिकांना मिळणार आहे. वास्तविक ‘तैलरंग लेपन’ आणि ‘जलरंग लेपन’ या दोन स्थिती आणि अनुभूती आहेत. अनिल नाईक यांची या दोन्ही रंगमाध्यमांवरील हुकूमत पाहण्याची पर्वणी म्हणजे हे प्रदर्शन होय. त्यांनी तीन ‘व’ म्हणजे वस्तू, व्यक्ती आणि वास्तुरहीत केलेली चित्रणे, अवकाश तसेच रंग यांच्या नात्यांचा शोध घेणारी आहेत. कलाध्यापक आणि कलाकार अर्थात चित्रकार म्हणून त्याची कलाकिर्द अद्भुतपणे पाव शतकाहून अधिक कला अवधीची ठरली. 2007 चे त्यांचे सिंहावलोकनी प्रदर्शन ‘मॅक्सम्युलर’ कलादालनात रसिक मनाचा ठाव घेऊन गेले. स्मृतीप्रवण ठरणारे हे प्रदर्शन म्हणजे चित्रकार अनिल नाईक यांची सामाजिक बांधिलकी जपणारे कलाविषयक योगदान सांगणारे ठरते.‍ॅक्रॅलिक, क्लासिक, पारंपरिक अशा तिन्ही शैक्षणिक कार्यकक्षेतून त्यांचा कलाप्रवास झाला, जो आजही अव्याहतपणे सुरू आहे. चित्रकलेतील अध्यापन आणि चित्रसाधना करीत असताना अवगत केलेल्या बर्‍याच गोष्टी, तंत्रे, अनुभव, प्रचंड असतानाही चित्राची गरज नसेल तर ते नाकारण्याचं धाडसही त्यांच्याकडे आहे. तद्वतच आजपर्यंत आकलन झालेले ज्ञान, भान, अनुभव तत्क्षणी दूर ठेवून अज्ञानाचा शोध निरागसपणे घेण्याची ऊर्जा-ऊर्मी त्यांच्या प्रत्येक सृजनाद्वारे जाणवत असते.त्यांचे १९९४चे
‘Introspection 94’ हे प्रदर्शन तर विलक्षण गाजले. टीका आणि प्रशंसा ही दोनही मतमतांतरे त्यांच्या कलाकृतींनी अनुभवली. त्यात त्यांनी ‘Nude Model' चे समोर बसवून चित्रीकरण करण्याची पारंपरिक कृती नाकारून, प्रत्यक्ष ‘Nude Model’, कोरे कॅन्व्हास आणि स्टुडिओच्या पांढर्‍या भिंती यावर एकत्रित काम करण्याचा अनुभव मांडला होता. कलेतील आणि शरीर प्रकृतीतील चढ-उतार वा अडचणी झुगारून, त्या दुर्लक्षित करून त्यांचा झालेला कलाप्रवास म्हणजे ‘मूर्तामूर्तचा मेळ’ होय. आचार्य रजनीश यांनी सांगितले होते, “कलाकाराला विशेषतः चित्रकाराला ‘अपघात’ हा व्हायलाच पाहिजे. म्हणजे त्याच्या प्रज्ञेतून अदम्य आणि दीर्घायुषी संवाद साधणारी कलाकृती जन्म घेते.” अनिल नाईक यांची प्रत्येक कलाकृती म्हणूनच दीर्घायुषी झालेली आहे.
-प्रा. गजानन शेपाळ