विशाल देवकांत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘मैत्री चषक’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

    दिनांक  01-Nov-2019 18:24:23
|

मुंबई
: क्रिकेट म्हणजे भारतीयांचा प्राण. या क्रिकेटमुळे अनेक मित्र जोडले जातात. अनेक नाती जोडली जातात. विशाल देवकांत हा असाच क्रिकेटवेडा मुंबईकर मुलगा. मित्रमंडळींमध्ये ‘अच्छू’ नावाने प्रसिद्ध. हसत खेळत असणारा २६ वर्षांचा विशाल अचानक सगळ्यांच्या आयुष्यातून निघून गेला. विशालच्या स्मृतीप्रित्यर्थ त्याच्या मित्रांनी मैत्री चषक स्पर्धेचे आयोजन केले आहे. उद्या शनिवारी दि. २ आणि ३ नोव्हेंबर रोजी शासकीय वसाहत, वांद्रे येथे ही क्रिकेट स्पर्धा होणार आहे. ‘दै. मुंबई तरुण भारत’ माध्यम प्रायोजक आहे.वांद्रे खेरवाडी विभागात मैदानाच्या कमतरतेमुळे गल्लीबोळात अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा मोठ्या प्रमाणावर होतात
. वांद्य्रात अशाप्रकारे अंडर आर्म क्रिकेट खेळणारे ५० ते ७५ संघ आहेत. यामध्ये विशाल देवकांत हा अच्छू म्हणून प्रसिद्ध होता. विशालच्या अकाली निधनाने या विभागातील तरुणांना मोठा धक्का बसला. मात्र त्याचवेळी आपल्या मित्राच्या आठवणी जपण्याचे त्यांनी ठरवले. त्यासाठी क्रिकेट हे माध्यम निवडले. २ नोव्हेंबर व ३ नोव्हेंबर या दोन दिवशी दिवस रात्र स्वरुपाच्या मैत्री चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये मुंबई पालघर ठाणे या मधील व्यावसायिक संघांचा समावेश आहे. 7T7T युट्युब चॅनल वर या क्रिकेट सामन्यांचे सलग दोन दिवस थेट प्रक्षेपण होणार आहे.ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी बान्द्रा बॉक्स क्रिकेट अर्थात बीबीसी संस्थेचे मोलाचे योगदान आहे
. बीबीसीने सहभागी होणार्‍या सर्व संघासाठी टी-शर्ट आणि जेवणाची उत्तम व्यवस्था केली आहे. तसेच मैत्री चषकात सहभागी होणार्‍या संघांना रोख पारितोषिक व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. मैत्री चषक क्रिकेट स्पर्धेस मीडिया पार्टनर म्हणून दै. मुंबई तरुण भारत सहभागी झाल्याबद्दल आयोजकांनी दै. मुंबई तरुण भारतचे आभार मानले आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क, स्वप्नील – ८६६९५०१४१२