राज ठाकरेंच्या पुण्यातील पहिल्याच सभेवर पाणी

    दिनांक  09-Oct-2019 20:37:18पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) सर्वेसर्वा राज ठाकरे यांची पुण्यातील सभा मुसळधार पावसामुळे ऐनवेळी रद्द करण्यात आली. लोकसभेतून माघार घेतल्यानंतर विधानसभा लढविण्याचा निर्णय मनसेने घेतला होता. त्यानंतर राज ठाकरेंची पहिली सभा ही पुण्यातील कसबा मतदारसंघातील सरस्वती मंदिर संस्थेच्या नातूबाग मैदानावर होणार होती. परंतु, मंगळवारपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे ही सभा रद्द करण्यात आली.

 

राज ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ यावेळी पुण्यातून फोडण्यात येणार होता. परंतु, त्याआधी पावसानेच खेळखंडोबा केल्याने ही सभा रद्द करत असल्याची माहिती ट्विटरवरून देण्यात आली. पुण्यात मंगळवारपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने मैदानात सर्वत्र चिखल झाला आहे तसेच, काही ठिकाणी पाणी साचले आहे. गेले काही दिवस मनसेला सभेसाठी मैदान मिळत नव्हते. आता मात्र मैदान मिळाले परंतु, पावसाने तडाखा दिला.