चिनी ‘बंदीशाळा’

    दिनांक  09-Oct-2019 20:31:22   
चीनने वीगर
, कझाख, किर्गिज आणि अन्य मुसलमानांनाही बंदी बनवत नाहक त्रास देणे सुरू केले आहे. शिक्षणाच्या नावाखाली त्यांना एखाद्या मजुरासारखे राबवून घेणे आणि त्यांच्या धार्मिक विचारसरणीत बदल घडविण्यासाठी साम-दाम-दंड-भेद या सार्‍या तंत्रांचा वापर करणे, हेच काम चीन या बंदीशाळांमध्ये करत आला आहे.


केवळ त्यांच्या चेहर्‍यावरूनच ते कुणाचीही हत्या करतील
, त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती वाटून उघूर या मुळच्या तुर्की वंशाच्या मुस्लिमांना चिनी प्रशासनाने डांबून ठेवले. चिनी कैदेत असलेल्या मुसलमानांची संख्या ही तब्बल १० लाख असल्याचा दावा याविरोधात आवाज उठवलेल्या देशांनी केला आहे. अगदी पद्धतशीरपणे या नागरिकांना त्यांच्या निवासस्थानातून कैद करून एका बंदिस्त जागी ठेवण्यात येते. ही जागा म्हणजे ना धड तुरुंग ना स्वातंत्र्य. म्हणजे जगाला दाखविण्यासाठी हे संभाव्य गुन्हेगारांना एक सुजाण नागरिक होण्यासाठी चालवले जाणारे जणू शिबीरच. मात्र, पडद्यामागे मानवतेचाही थरकाप उडेल, अशा पद्धतीची वागणूक चीनमधील कम्युनिस्टांचे सरकार उघूर मुस्लिमांना देत आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने चीन सरकार आणि प्रशासकीय अधिकारी, तसेच कम्युनिस्ट पक्षांच्या नेत्यांना अमेरिकेत व्हिसाबंदी केली.आता या सगळ्या आरोपांना चीनने मात्र फेटाळून लावले आहे
. “आमच्या अंतर्गत गोष्टीत नाक खुपसू नका,” असे म्हणत चीन आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकेने गेल्या आठवड्यातही २८ चिनी संस्थांना काळ्या यादीत टाकत सदर प्रकाराबाबत विरोध दर्शविला होता. आता अमेरिकेने व्हिसाच्या मुद्द्यावरून चीनला घेरले आहे. म्हणूनच अमेरिका केवळ राजकारण करत असल्याचा आरोप चीनने केला आहे. चीनने वीगर, कझाख, किर्गिज आणि अन्य मुसलमानांनाही बंदी बनवत नाहक त्रास देणे सुरू केले आहे. शिक्षणाच्या नावाखाली त्यांना एखाद्या मजुरासारखे राबवून घेणे आणि त्यांच्या धार्मिक विचारसरणीत बदल घडविण्यासाठी साम-दाम-दंड-भेद या सार्‍या तंत्रांचा वापर करणे, हेच काम चीन या बंदीशाळांमध्ये करत आला आहे. मात्र, या बंदीशाळा नसून लोक कट्टरतावाद सोडून सर्वसामान्य जीवन जगायला इथे आल्याची सारवासारव चीनने केली. चिनी प्रसारमाध्यमांनाही या ठिकाणी बंदी आहे. प्रसारमाध्यमांना केवळ चिनी अधिकारी सांगतील, तिथेच जाण्यास परवानगी आहे.प्रसारमाध्यमे ज्यावेळी या बंदीशाळांमध्ये गेली
, त्यावेळी सारं काही आलबेल आहे, असा दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. नुकत्याच काही आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी या बंदीशाळांना भेटी दिल्या. यावेळी चाणाक्ष पत्रकारांच्या नजरेतून बंदीवान मुसलमानांचे हाल लपलेले नाहीत. ज्यावेळी प्रसारमाध्यमे किंवा तिसरा व्यक्ती या शाळांची पाहणी करण्यासाठी येतो, त्यावेळी येथील बंदींना तशी पूर्वसूचना दिली जाते. त्यांनी बाहेरील व्यक्तीला अंतर्गत सुरू असलेल्या हालचालींची माहिती दिली, तर यापेक्षाही भयाण जागी रवानगी करू, अशी धमकीच दिली जाते. इतर व्यक्तींसमोर इथले बंदी नाचगाणी करायला सुरुवात करतील, सारं काही सुशेगात सुरू असल्याचा देखावा निर्माण करतील, आम्ही नवीन गोष्टी शिकत असल्याचे भासवतील. मात्र, हे सारं काही तात्पुरते असते. काही बंदिवांनांनी प्रसारमाध्यमांनाही मुलाखती दिल्या. आमची कट्टरतावादी विचारसरणी संपवण्यासाठी आम्ही इथे आलोय, असे त्यांनी सांगितले. पण, स्वतःहून अशा बंदीवासात कोण येईल, हाच प्रश्न उपस्थित होतो. या बंदिवानांना त्यांच्या धर्मानुसार नमाजपठण करण्यासही परवानगी नाही. धार्मिक कार्य करण्यासही बंदी, चिनी व मंदारिन भाषा शिकण्याची सक्ती, कम्युनिस्टवादी विचारांची शिकवणी, वामपंथी सरकारचा आदर करणारी विचारसरणी थोपवणे आदी प्रकारची जबरदस्ती या शाळेत होत असल्याचा आरोप चीनवर आहे.एखाद्या गोठ्यात कोंडलेल्या गुरांची अवस्था बरी म्हणावी
, अशा प्रकारचे हे कोंडवाडे. सर्वांसाठी एकच शौचालय, स्नानगृहे, वीट येईल अशी राहण्यासाठी जागा. मुळात दाखवण्यासाठी इथे खेळाची मैदाने आहेत, अभ्यासवर्ग आहेत. मात्र, इथे प्रशिक्षणाच्या नावाखाली ब्रेनवॉशिंगचा प्रकार चालत असल्याचाही संशय आहे. चिनी अधिकारी मात्र या सार्‍यावर सारवासारव करताना दिसतात. बंदिवान मुस्लीम हे संभाव्य गुन्हेगार दिसतात. त्यांना असंच समाजात सोडून दिल्यास ते गुन्हे करतील, अशी भीती ते व्यक्त करतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला त्यांच्या दिसण्यावरून तो कसा वागेल, याचे ठोकताळे बांधणे कितपत योग्य, हे तेच सांगू शकतील. या बंदीशाळेतून बाहेर पडणार्‍या एका कैद्याने दिलेल्या माहितीनुसार, केवळ व्हॉट्सअ‍ॅप फोनमध्ये आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आली होती. इथे आलेल्या प्रत्येक कैद्याची हीच व्यथा आणि या बंदिशाळेच्या जंजाळातून त्यांची सुटका होणे नाही.