अभिमानास्पद ! मिताली राजच्या नावावर 'हा' नवा रेकॉर्ड

    दिनांक  09-Oct-2019 17:23:46मुंबई : सध्या महिला क्रिकेट संघाची कामगिरी दिवसेंदिवस उंचावत चालली आहे. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाला प्रमुख दावेदार मानले जाते. त्याचप्रमाणे, मिताली राज ही महिला क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळाडूंमध्ये एक मानली जाते. भारताच्या महिला एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट संघाची कर्णधार असलेल्या मितालीने आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. मितालीने एकदिवसीय क्रिकेट खेळताना आपल्या कारकिर्दीची २० वर्ष पूर्ण केली. अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

 

२६ जून १९९९ मध्ये मितालीने आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आगामी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेवर लक्ष देण्यासाठी तिने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तिने ३२ टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. यामध्ये तीन टी-२० विश्वकरंडक स्पर्धांचा समावेश आहे. भारताकडून मितालीने २०१२, २०१४ आणि २०१६ च्या टी -२० विश्वचषक स्पर्धेमध्ये भाग घेतला होता.

 

८८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये मितालीने २,३६४ धावा केल्या आहेत. या धावा करताना ३७.५२ ची तिची सरासरी राहिली आहे. या धावांमध्ये मितालीच्या १७ अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत मितालीने २०३ सामने खेळले आहेत. या सामन्यात खेळताना तिने ७ शतके आणि ५२ अर्धशतकांसह ६७२० धावा केल्या आहेत.

 

सचिन तेंडुलकरनंतर मितालीच...

 

जागतिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरनंतर मिताली राजचेच नाव घेतले जाते. सचिनने सर्वाधिक २२ वर्षे क्रिकेटमध्ये वेचली आहेत. तर, श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याने २१ वर्ष क्रिकेटसाठी दिली. पॅलिस्तानचे जावेद मियांदाद यांनी २० वर्ष क्रिकेट खेळलेले आहेत. त्यानंतर २० वर्ष पूर्ण करणारी मिताली राज ही जगातून पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे.