भाजप दहिसरचा गड अभेद्य ठेवणार

    दिनांक  09-Oct-2019 19:33:14
|
मुंबईच्या उत्तर टोकाला असलेला दहिसर विधानसभा मतदारसंघ भाजपच्या विद्यमान आमदार मनीषा चौधरी यांनी कार्यकर्तृत्वाने आपल्या नावावर केल्यासारखाच आहे
. दहिसर हा पूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात असे. शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांचे तेथे मोठे प्राबल्य होते. मात्र, न झालेली युती, शिवसेनेतील अंतर्गत वाद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट यामुळे शिवसेनेचे घोसाळकर २०१४ मध्ये दहिसरमधून पराभूत झाले आणि मनीषा चौधरी यांनी तेथून विजय मिळवत भाजपचा झेंडा फडकवला. तेव्हापासून त्यांनी विधानसभेत सातत्याने तेथील प्रश्नांविषयी आपला आवाज बुलंद ठेवला आहे.

 


मनीषा चौधरी या दहिसरमध्ये नगरसेवक म्हणूनही कार्यरत होत्या. त्यामुळे त्यांचा तळागाळातल्या मतदारांशी संपर्क आहे. त्याचा त्यांना मोठा फायदा होणार आहे. गेल्या पाच वर्षांत मतदारांचे समाधान करता आले नसले तरी येथील समस्यांविषयी त्यांनी सातत्याने आवाज उठविला आहे. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युती झाल्याने मनीषा चौधरी यांच्यासमोरचे शिवसेनेचे आव्हान आपोआपच संपुष्टात आले आहे आणि इतर विरोधकांकडून तसा तुल्यबळ उमेदवार नाही. त्यांनी उमेदवार उभे केले असले तरी पक्षाचे नाव झळकण्यापुरते त्यांचे अस्तित्व राहील, अशी सध्या तरी परिस्थिती आहे. या मतदारसंघामध्ये आघाडीची पकड तुलनेने कमजोर आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अरुण सावंत यांना येथून उमेदवारी मिळाली आहे. मात्र, चौधरी यांच्यापुढे त्यांचा निभाव लागेल असे वाटत नाही. मनसेतर्फे राजेश येरूणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवाय इतरही पाचजण आहेत. मात्र, हे उमेदवार चौधरी यांच्यापुढे फारच कमजोर वाटतात. त्यामानाने मनीषा चौधरी या सर्वांच्या मानाने प्रबळ उमेदवार आहेत.
या मतदारसंघात गणपत पाटील नगर झोपडपट्टीचा पुनर्विकास
, दहिसर नदीचा विकास आणि सुशोभीकरण या महत्त्वाच्या प्रश्नांसह अनेक प्रकल्पांची कामे व्हायची आहेत. आगरी-कोळी बांधवाचे अनेक प्रश्न आहेत. वाहतूककोंडीचा प्रश्न सातत्याने सतावणारा आहे. मात्र, फडणवीस सरकारच्या काळात सुरू झालेले मेट्रोचे काम वाहतूककोंडीवर उपाय ठरणार आहेभाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांचा दांडगा लोकसंपर्क हीसुद्धा भाजपच्या उमेदवाराची जमेची बाजू आहे. लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांना ९० हजार, ९४७, तर काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांना २९ हजार, ३८३ मते पडली होती. त्या निकालाची छाप विधानसभेच्या निवडणुकीवर नक्कीच पडेल. शिवाय या मतदारसंघात मराठी भाषिक लोक सर्वात जास्त असून उत्तर भारतीय आणि व्यापारी लोकसुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र, भाषिक मतविभागणी होण्यासारखा येथे मनीषा चौधरी यांच्या विरोधात तगडा उमेदवार नाही. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत चौधरी भाजपचा गड अभेद्य राखणार, हे निश्चित.

-अरविंद सुर्वे